18 कोटींपेक्षा अधिक रुपयांना विकलं जातंय 5 शब्दांचं एक ट्विट; जाणून घ्या, याबद्दल काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 12:54 PM2021-03-07T12:54:44+5:302021-03-07T13:15:47+5:30

twitter boss jack dorsey first tweet auction bidding reaching 2 million dollar : ट्विट खरेदी करण्यासाठी 18.2 कोटी रुपयांपर्यंत बोली लावण्यात आली आहे.

ट्विटरचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांच्या पाच शब्दांचे ट्विटचा लिलाव होत आहे. हे ट्विट खरेदी करण्यासाठी 18.2 कोटी रुपयांपर्यंत बोली लावण्यात आली आहे.

खरंतर, जॅक डोर्सी यांच्याकडून ट्विटरवर करण्यात आलेली ही पहिली पोस्ट होती. 21 मार्च 2006 रोजी केलेल्या या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते की, ते आपले ट्विटर अकाउंट तयार करीत आहेत. (just setting up my twttr)

ट्विटची विक्री करणार्‍या https://v.cent.co/ या वेबसाइटमार्फत जॅक डोर्सी यांच्या ट्विटचा लिलाव केला जात आहे. हे ट्विट विकत घेईल, त्याला जॅक डोर्सी यांच्या ऑटोग्राफसह ट्विटचे सर्टिफिकेट दिले जाईल.

रविवारी सकाळपर्यंत जॅक डोर्सी यांच्या ट्विटला सर्वाधिक 18.2 कोटींची बोली लागली आहे. मलेशियन कंपनी Bridge Oracle च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीना इस्तवी यांनी जॅक डोर्सीच्या ट्विटसाठी इतकी मोठी रक्कम ऑफर केली आहे.

यापूर्वी या ट्विटसाठी अन्य एका व्यक्तीने 14.6 कोटी रुपयांची बोली लावली होती. जॅक डोर्सीचे पहिले ट्विट खरेदी करणे म्हणजे खरेदीदाराजवळ त्या ट्विटचे डिजिटल सर्टिफिकेट असेल.

जॅक डोर्सीच्या ट्विटची विक्री असूनही हे ट्विट सोशल मीडियावर सर्वसामान्यांसाठी कायम राहील. हे ट्विट किती काळ ऑनलाइन ठेवायचे आहे, हे जॅक डोर्सी आणि ट्विटरवर अवलंबून असणार आहे.

विशेष म्हणजे, गेल्या 15 वर्षांपासून जॅक डोर्सी यांचे हे ट्विट इंटरनेटवर फुकटात उपलब्ध आहे. तरीही या ट्विटचे मालकी हक्क घेण्यासाठी इतक्या रुपयांची बोली लागली आहे.

अलिकडच्या काळात व्हर्च्युअल सामग्री किंवा डिजीटल आयटम्सची खरेदी-विक्री करण्याचा ट्रेंड वाढला आहे. काही दिवसांपूर्वी 10 सेकंदाची व्हिडिओ क्लिप 48.2 कोटी रुपयांना विकण्यात आली होती.

दरम्यान, एनएफटी (नॉन-फंजिबल टोकन)द्वारे डिजीटल आयटम्सची खरेदी-विक्री करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच, ब्लॉकचेनचा वापर करणाऱ्या लोकांचे रेकॉर्डही ठेवले जाते. प्रसिद्ध आर्टिस्ट ग्रीम्स यांनी नुकतेच 60 लाख डॉलरमध्ये एनएफटी आयटम विकले आहेत.

याचबरोबर, लेब्रोन जेम्सच्या एका एनएफटीने लेकर्ससाठी 2,00,000 डॉलर पेक्षा अधिक म्हणजे दोन कोटीपेक्षा अधिक कमाई केली होती. ही ऐतिहासिक कमाई होती.