बुर्ज खलिफामध्ये दोन मजले, १८ हजार कोटींचा बँक बॅलन्स; एक ट्विट आणि ७४ रुपयांना विकाली लागली कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:28 IST2025-03-25T17:23:17+5:302025-03-25T17:28:37+5:30

युएईमध्ये हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये गडगंज संपत्ती आणि नाव कमावणाऱ्या भारतीयाला केवळ ७४ रुपयांना त्याची कंपनी विकावी लागली होती.

बीआर शेट्टी यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यात झाला. सुरुवातीच्या आयुष्यात त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. केवळ ६६५ रुपये घेऊन तो चांगल्या संधीच्या शोधात आखाती देशात पोहोचले होते.

सुरुवातीच्या काळात त्यांनी फार्मासिस्ट म्हणून काम केले आणि नंतर त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी एक साम्राज्य उभे केले ज्याचे नेहमीच उदाहरण दिले जाते.

बीआर शेट्टी यांनी NMC Health ची स्थापना केली. जी संयुक्त अरब अमिरातीची सर्वात मोठी खाजगी आरोग्य सेवा कंपनी बनली. एनएमसी हेल्थने आरोग्य सेवेमध्ये नवीन उंची गाठली आणि अनेक देशांमध्ये आपल्या सेवा सुरू केल्या.

शेट्टी यांच्याकडे दुबईच्या प्रतिष्ठित बुर्ज खलिफाचे दोन संपूर्ण मजले होते, ज्याची किंमत सुमारे २०७ कोटी रुपये होती. याशिवाय दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पाम जुमेराह येथेही त्यांची मालमत्ता होती. शेट्टींच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस आणि मेबॅकसारख्या महागड्या कारचा समावेश होता.

याशिवाय त्यांनी एका खासगी जेटचा ५० टक्के हिस्साही खरेदी केला, ज्याची किंमत ३४ कोटी रुपये होती. त्यांनी युएई एक्सचेंज आणि Finablr सारख्या वित्तीय सेवा कंपन्या देखील स्थापन केल्या, ज्या रेमिटन्स सेवांमध्ये महत्त्वाच्या बनल्या.

२०१९ मध्ये शेट्टींचे साम्राज्य ढासळू लागले. यूके-स्थित मडी वॉटर्सने एका ट्वीटमधून बीआर शेट्टीच्या कंपन्यांवर आर्थिक फसवणूकीचा आरोप केला जेव्हा शॉर्ट-सेलिंग फर्मने १ अब्ज डॉलर्सचे कर्ज उघडकीस आणणारा अहवाल प्रसिद्ध केला तेव्हा गुंतवणूकदारांचा विश्वास उडाला आणि कंपनीचे शेअर्स कोसळले.

यानंतर तीन महिन्यांत शेट्टी यांच्या कंपनीला लंडनच्या शेअर बाजारातही बंदी आणण्यात आली आहे. तपासादरम्यान असे आढळून आले की कंपनीवर ४ अब्ज डॉलर्स (सुमारे २९,५०० कोटी रुपये) कर्ज होते, ज्याची माहिती दिली गेली नव्हती. त्यानंतर युएई एक्सचेंजने तत्याच्या सर्व शाखा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून नवीन व्यवहार बंद केले.

शेट्टी यांच्या कंपनीवर प्रचंड कर्जाचा बोजा पडला होता आणि त्यामुळे त्यांना त्यांची १२,४७८ कोटी रुपयांची कंपनी इस्रायली-यूएई कन्सोर्टियमला ​​केवळ ७४ रुपयांना विकावी लागली. कॉर्पोरेट जगतातील हा सर्वात धक्कादायक व्यवहार होता.