Uday Kotak Kotak Mahindra Bank : डोक्यावर लागलेल्या चेंडूनं तोडलं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न; आज आहेत देशातील दिग्गज बँकर By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 09:12 AM 2022-03-15T09:12:24+5:30 2022-03-15T09:25:04+5:30
Uday Kotak Birthday : मैदानावरील एका घटनेनं बदललं उदय कोटक यांचं संपूर्ण आयुष्य. आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले, परंतु त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. Uday Kotak Birthday : व्हायचं होतं क्रिकेटर, पण एक चेंडू बॅट ऐवजी त्यांच्या डोक्यावर जाऊन आदळला आणि त्या चेंडूं त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. या घटनेनंतर त्या क्रिकेटपटूला आपलं क्रिकेटचं (Cricket) स्वप्न मध्येच सोडावं लागलं. हे नाव म्हणजे दिग्गज बँकर उदय कोटक (Uday Kotak).
जर वयाच्या २० व्या वर्षी कोटक यांच्यासोबत ही घटना घडली नसती तर आज ते जगातिल सर्वात श्रीमंत बँकर (Banker) पैकी एकही नसते. आज उदय कोटक यांचा वाढदिवस (Uday Kotak Birthday) आहे.
उदय कोटक यांना आज परिचयाची गरज नाही. उदय कोटक हे भारतीय बँकर, कोटक महिंद्रा बँकेचे कार्यकारी महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. बँकिंग क्षेत्रात त्यांनी मोठं यशही मिळवलं आहे. गेल्या ३५ वर्षांत उदय कोटक यांनी अनेक संकटांचा सामना केला, पण त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
उदय कोटक हे जवळपास १८ वर्षांपासून कोटक महिंद्रा बँकेचे नेतृत्व करत आहेत. कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडला २२ मार्च २००३ रोजी रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना मिळाला. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील ही पहिली कंपनी होती जिला बँकिंगसाठी ग्रीन सिग्नल मिळाला. आजमितीस, कोटक महिंद्रा बँकेचे मार्केट कॅप सुमारे ३.५५ लाख कोटी रुपये आहे.
उदय कोटक यांनी आनंद महिंद्रा यांच्या मदतीने १९८६ मध्ये नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी सुरू केली. अवघ्या ३० लाख रुपयांच्या भांडवलाने ही सुरुवात झाली. बिल डिस्काउंटच्या कामापासून सुरूवात झालेल्या या फर्मनं नंतर लोन पोर्टफोलिओ, स्टॉक ब्रोकिंग, इनव्हेस्टमेंट बँकिंग, इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये विस्तार केला. त्यानंतर २००३ मध्ये यानं कोटक महिंद्रा बँकेचं रुप घेतलं.
उदय कोटक हे व्यापारी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचा कौटुंबिक व्यवसाय कापसाचा होता. पण कुटुंबापासून दूर राहून त्यांनी वेगळा मार्ग निवडला. सुरुवातीला कुटुंबीय त्यांच्याशी सहमत नव्हते. पण उदय कोटक यांनी दृढ निश्चय केला होता आणि वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी कोटक बँकेचा पाया रचला. उदय कोटक यांचा जन्म १५ मार्च १९५९ रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईतच राहतं.
ते सुरूवातीपासूनच उत्तर क्रिकेटर तर होतेच, पण ते अभ्यासातही हुशार होते. गणित हा त्यांचा आवडीचा विषय होता. उदय कोटक यांनी सिडनाम कॉलेजमधून बॅचलरची पदवी घेतली आहे. त्यानंतर जमना लाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीएचं शिक्षण घेतलं.
वयाच्या २० व्या वर्षी जेव्हा ते क्रिकेटच्या मैदानावर खेळत होते, तेव्हा त्यांच्या डोक्यावर चेंडू आदळला आणि ते मैदानावरच बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आलं आणि डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे शस्त्रक्रियाही करण्यात आली. यानंतर त्यांना क्रिकेट सोडावं लागलं आणि त्यांच्या शिक्षणावरही वर्षभरासाठी ब्रेक लागला.
पदवीनंतर, उदय कोटक यांनी 'कोटक कॅपिटल मॅनेजमेंट फायनान्स लिमिटेड' सोबत बिल डिस्काऊंट सर्व्हिसची सुरू केली, त्यानंतर महिंद्रा समूहात सामील झाल्यानंतर ही कंपनी 'कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड' बनली.
उदय कोटक यांच्या या यशामागे त्यांची पत्नी पल्लवी कोटक यांचीही मोठी भूमिका आहे. १९८५ मध्ये ते त्यांनी विवाह केला. सुरूवातीपासूनच पल्लवी यांनी उदय कोटक यांना नोकरी करण्याऐवजी आपला व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला होता. उदय कोटक आणि पल्लवी कोटक यांना दोन अपत्येही आहेत.