Income Tax Saving : वर्षाला १० लाखांची कमाई... तरीही १ रुपयाही कर भरावा लागणार नाही; जाणून घ्या, नवीन टॅक्स स्लॅबमुळे किती पैसे वाचणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 08:18 AM2024-07-24T08:18:10+5:302024-07-24T08:38:53+5:30

Union Budget 2024 : जर तुमचा पगार १० लाख रुपये असेल, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण उत्पन्नावर कर कसा वाचवू शकता. याबाबत जाणून घ्या, तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलैला देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये नवीन कर प्रणाली (New Tax Regime) अंतर्गत अर्थमंत्र्यांनी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत.

नवी कर प्रणाली स्वीकारणाऱ्या नोकरदार वर्गाला खुशखबर देत स्टँडर्ड डिडक्शनची (Standard Deduction) मर्यादा ५० हजारांवरून थेट ७५ हजार करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. त्यामुळे नोकरदार वर्गाचे ७.७५ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न आता करमुक्त झाले आहे.

कर स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. या बदलानंतर, आता नवीन कर प्रणाली अंतर्गत वार्षिक ७.७५लाख रुपये कमावणाऱ्यांना एक रुपयाही कर भरावा लागणार नाही, परंतु जर तुमचा पगार १० लाख रुपये असेल, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण उत्पन्नावर कर कसा वाचवू शकता. याबाबत जाणून घ्या, तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.

जर तुम्हाला १० लाख रुपयांच्या उत्पन्नावर संपूर्ण पैसे वाचवायचे असतील तर तुम्हाला नवीन कर प्रणाली सोडून जुन्या कर प्रणालीचा (Old Tax Regime)पर्याय निवडावा लागेल. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या सवलतींचा दावा करावा लागेल. परंतु जर तुम्ही कर सवलतीचा दावा केला नाही, तर तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत कर स्लॅबनुसार २० टक्के कर भरावा लागेल. दरम्यान, जर तुम्ही कर सवलतीचा दावा केला तर तुम्ही १० लाख रुपयांच्या उत्पन्नावरील संपूर्ण कर वाचवू शकता.

जुन्या कर प्रणाली अंतर्गत स्टँडर्ड डिडक्शन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. अशा परिस्थितीत आता ९.५० लाख रुपयांवर कर आकारला जाणार आहे.

PPF, EPF, ELSS, NSC सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही आयकर कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांचा कर वाचवू शकता. आता आठ लाख रुपयांवर कर भरावा लागणार आहे.

तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये वार्षिक ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला कलम ८० सीसीडी (१बी) अंतर्गत ५० हजार रुपयांची अतिरिक्त कर सूट दिली जाते. आता ५० हजार रुपये अधिक वजा केल्यास ७.५० लाख रुपयांवर कर आकारला जाईल.

याचबरोबर, जर तुम्ही गृहकर्जही घेतले असेल, तर तुम्ही आयकर कलम २४ बी अंतर्गत त्याच्या व्याजावर २ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. जर तुम्ही ७.५० लाखांमधून २ लाख अधिक वजा केले तर एकूण कर उत्पन्न ५.५० लाख होईल.

आयकर कलम ८० डी अंतर्गत वैद्यकीय पॉलिसी घेऊन तुम्ही २५ हजार रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. या आरोग्य विम्यात तुमचं नाव, तुमची पत्नी आणि मुलांची नावं असली पाहिजेत. याशिवाय, तुम्ही तुमच्या पालकांच्या नावानं आरोग्य विमा खरेदी केल्यास तुम्हाला ५० हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही ५.५० लाख रुपयांमधून ७५ हजार रुपये वजा केले, तर एकूण कर दायित्व ४.७५ लाख रुपये असेल, जे ५ लाख रुपयांच्या जुन्या कर प्रणालीच्या मर्यादेपेक्षा कमी असेल. याचा अर्थ १० लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.

जरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीमध्ये कर स्लॅब बदलले आणि स्टँडर्ड डिडक्शन वाढवली तरीही तुम्हाला १० लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर भरावा लागेल. नवीन कर प्रणाली अंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही कर सूट मिळवू शकत नाही.

जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये असेल आणि त्याने नवीन कर प्रणालीची निवड केली असेल, तर त्याला ५० हजार रुपयांऐवजी ७५ हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. म्हणजे एकूण करपात्र उत्पन्न ९ लाख २५ हजार रुपये असेल आणि ५२,५०० रुपयांऐवजी केवळ ४२,५०० रुपयेच कर भरावा लागेल. याचा अर्थ आता वार्षिक १० लाख रुपये कमावणारे लोक नवीन कर प्रणालीमध्ये १० हजार रुपये अधिक वाचवू शकतील.