देशात UPI ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! डिसेंबरमध्ये ८.२७ लाख कोटी रुपयांचे ४५६ कोटी व्यवहार; पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 04:35 PM2022-01-03T16:35:57+5:302022-01-03T16:40:54+5:30

...तर भारतात दररोज १०० कोटींपर्यंत UPI व्यवहार होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

कोरोना संकटकाळापासून भारतात ऑनलाइन/डिजिटल पद्धतीने होणाऱ्या व्यवहारांमध्ये प्रचंड मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. डिजिटल पेमेंटचा वापर करणाऱ्यांचा आलेख सातत्याने चढता दिसत आहे.

भारतात UPI द्वारे पेमेंटची संख्याही दर महिन्याला नवीन उंची गाठत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये UPI Transaction ने आपले जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. डिसेंबरमझ्ये युपीआयचे ४५६ कोटी ट्रान्जेक्शन करण्यात आले आहेत.

या UPI व्यवहारांची एकूण किंमत ८.२७ लाख कोटी रुपये असून जी आतापर्यंतची सर्वाधिक किंमत आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये फेस्टिव्ह सीझन दरम्यान यूपीआयचे ४२१ कोटी व्यवहार पूर्ण झाले होते.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या वतीने डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या युपीआय व्यवहाराबाबत जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या व्यवहारांच्या तुलनेत ९ टक्क्यांनी अधिक आहे.

या व्यवहारांच्या किंमतीबाबत बोलायचे तर ही डिसेंबर २०२० च्या तुलनेत ७.६ टक्क्यांहून अधिक आहे. एनपीसीआय (NPCI) च्या आकडेवारीबाबत बोलायचे झाले तर, २०२१ या वर्षात एकूण ३८०० कोटी युपीआय व्यवहार करण्यात आले आहेत.

एनपीसीआयचा दावा आहे की, जर कमी किंमत असणाऱ्या ऑफलाइन व्यवहाराला मंजुरी मिळाली तर दररोज १०० कोटींपर्यंत UPI व्यवहार होऊ शकतात.

UPI व्यवहारांचा ग्राफ गेल्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या ४ वर्षांत यूपीआय व्यवहार तब्बल ७० पटींनी वाढ झाली आहे.

तर या कालावधीत डेबिट कार्डमुळे होणारे व्यवहार कमी झाले आहेत. UPI व्यवहार कार्ड ट्रान्जेक्शनच्या तुलनेत ८ पटींनी अधिक आहे.

भारतात आताच्या घडीला UPI व्यवहारांमध्ये फोन पे, गुगल पे, भीम, पेटीएम यांसारखे अनेक प्लॅटफॉर्म आघाडीवर असून, अगदी मोबाइल रिजार्चपासून ते इंशुरन्स पॉलिसी काढण्यापर्यंत अनेक व्यवहार यामधून केले जाऊ शकतात.