Vedanta Foxconn Project: १.५४ कोटीचा प्रकल्प गुजरातला नेला, पण उभारणार कसा? वेदांताला फायनान्सर मिळेना, चिंता वाढली! By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 03:41 PM 2022-12-16T15:41:11+5:30 2022-12-16T15:45:53+5:30
Vedanta Foxconn Project: गुजरातमध्ये गेलेला वेदांताचा प्रकल्प उभारण्यासाठी अनिल अगरवाल यांना गुंतवणूकदार मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. यावरून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अद्यापही यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. एका रिपोर्टनुसार, वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये उभारत असलेल्या सेमीकंडक्टर चीपच्या प्रकल्पाला वित्तपुरवठादार सापडत नसल्याचे सांगितले जात आहे. (vedanta foxconn project gujarat)
वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला गुजरातमध्ये प्रकल्प उभा करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अनिल अगरवाल यांच्या प्रतिनिधींनी पश्चिम आशिया, सिंगापूर आणि यूएसमध्ये अनेक वित्त पुरवठादारांची मोठ्या निधीसाठी भेट घेतली, अशी माहिती ब्लूमबर्गने या प्रकरणाशी निगडीत सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
अब्जाधीश अनिल अगरवाल हे नियोजित १.५४ लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या सेमीकंडक्टर चीप निर्मिती प्रकल्पासाठी आर्थिक पाठबळ मिळवताना अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामूळे मूळ महाराष्ट्रातील नियोजित प्रकल्प अकस्मात गुजरातला हलविण्याच्या निर्णयावरून बराच राजकीय धुरळा उडणे सुरू असताना, या प्रकल्पला गुजरातमध्ये प्रत्यक्ष सुरुवात होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुजरातमधील वेदांता-फॉक्सकॉनच्या नियोजित चीप निर्मितीच्या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी वेदांता कंपनीचे प्रतिनिधी गेल्या तीन महिन्यांपासून आखाती देश, सिंगापूर आणि अमेरिकेत युद्ध पाळतीवर प्रयत्न करत आहेत. गुंतवणुकीच्या संधीच्या शोधात असलेल्या तेथील फंडांपुढे कंपनीकडून प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र, कोणत्याही फंडांकडून प्रत्यक्ष पाऊल पडताना दिसत नाही.
सप्टेंबर महिन्यात अनिल अगरवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून वेदांता रिसोर्सेस लिमिटेडच्या भारतातील उपकंपनीकडून चीप निर्मिती प्रकल्पात गुंतवणूक केली जात असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु त्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी हा व्यवसाय व्होल्कन द्वारे राबवला जाईल, असे सांगितले.
तसेच हा पकल्प गुजरातमध्ये उभारणार असल्याचे घोषित करताना जगभरात वापरात असलेल्या बहुतांश आयफोनची असेंबली करत असलेल्या होन आय प्रीसिजन इंडस्ट्री कंपनीसोबत भागीदारीतून हा प्रकल्प साकारत असल्याचे अनिल अगरवाल यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.
व्होल्कन इनव्हेस्टमेंट लिमिटेड हा अगरवार यांचा कौटुंबिक विश्वस्त न्यास आहे. चीपनिर्मिती आणि डिस्प्ले उपक्रमांमध्ये नजीकच्या काळात मोठी गुंतवणूक येण्याची केंद्रातील सरकारची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षांत उभारल्या जाणाऱ्या उत्पादन प्रोत्साहन योजनेअंतर्गत अशा प्रकल्पांसाठी अर्धा भांडवली खर्च उचलण्याचा प्रस्तावही सरकारकडून देण्यात आलेला आहे.
वाढती सेमीकंडक्टर चीपची मागणी आणि तुलनेने अल्प पुरवठा अशी स्थिती असलेल्या या क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षक असली तरी अगरवाल यांनी ज्या गुंतवणूकदारांपुढे प्रकल्पासंदर्भातील प्रस्ताव मांडला आहे, त्यांनी या क्षेत्रातील समूहाच्या मर्यादित अनुभवाबाबत आणि ताणलेल्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
व्होल्कन कंपनीच्या प्रवक्त्यांनी सदर माहिती दिली आहे. दरम्यान, हा सामंजस्य करार भारताच्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग महत्त्वाकांक्षेला गती देणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे. १.५४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला आणि नोकऱ्यांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रभाव निर्माण होईल. यामुळे सहाय्यक उद्योगांसाठी एक मोठी परिसंस्था निर्माण होईल आणि आपल्या एमएसएमईंना मदत होईल, असे ट्विट मोदींनी केले होते.
नवीन वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याची घोषणा करताना आनंद होत आहे. ही ऐतिहासिक बाब आहे. वेदांताची १.५४ लाख कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण गुंतवणूक आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाची असून, यामुळे सिलिकॉन व्हॅली प्रत्यक्षात आणण्यास मदत होऊ शकेल, असे ट्विट अनिल अगरवाल यांनी केले होते.