Vodafone Idea: टाटाने केली होती मोठी गुंतवणूक, अंबानी येताच कंपनीचा खेळ बिघडला; आता बंद होण्याच्या मार्गावर By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 06:03 PM 2023-03-29T18:03:25+5:30 2023-03-29T18:09:57+5:30
कर्जात बुडालेली भारतातील दिग्गज दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाच्या (Vi) अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. नवी दिल्ली : कर्जात बुडालेली भारतातील दिग्गज दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाच्या (Vi) अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ (Jio) आणि एअरटेलने (Airtel) ने दिलेल्या तगड्या स्पर्धेने Vi चे कंबरडे मोडले आहे. भारतातील तिसरी आणि जगातील 11वी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियावर 2.3 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.
रिपोर्टनुसार, दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा, वाढते कर्ज आणि आवश्यक रक्कम उभारण्यात होणारा विलंब, यामुळे पुढील काही महिन्यांत व्होडाफोन आयडिया आपले कामकाज बंद करू शकते. व्होडाफोन आयडिया एकेकाळी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी होती. एकेकाळी टाटा समूहाचीही यात गुंतवणूक होती. मात्र आज ही कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. कंपनीचा शेअर 52 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे.
Vodafone Idea ही आदित्य बिर्ला समूह आणि UK स्थित Vodafone Inc यांची कंपनी आहे. याची सुरुवात 1995 मध्ये बिर्ला कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणून झाली होती. त्याच वर्षी कंपनीला गुजरात आणि महाराष्ट्र सर्कलमध्ये GSM आधारित सेवांसाठी परवाना मिळाला. 1996 मध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज आणि अमेरिकन कंपनी AT&T कॉर्पोरेशनने एक संयुक्त उपक्रम स्थापन केला आणि नाव बदलून बिर्ला AT&T कम्युनिकेशन्स लिमिटेड करण्यात आले.
1997 मध्ये कंपनीने गुजरात आणि महाराष्ट्र मंडळांमध्ये आपली सेवा सुरू केली. 2000 मध्ये ती टाटा सेल्युलर लिमिटेडमध्ये विलीन झाली आणि पुढच्या वर्षी त्याचे नाव बिर्ला टाटा एटी अँड टी लिमिटेड असे ठेवण्यात आले. 2002 मध्ये पुन्हा कंपनीचे नाव बदलून Idea Cellular Limited केले आणि Idea ब्रँड लाँच केला. 2004 मध्ये कंपनी पहिल्यांदा नफ्यात आली.
2006 मध्ये टाटा समूहाने कंपनीतील आपले संपूर्ण शेअरहोल्डिंग आदित्य बिर्ला समूहाकडे हस्तांतरित केले. अशा प्रकारे टाटा समूह या कंपनीपासून पूर्णपणे वेगळा झाला. 2009 मध्ये कंपनीने देशभरात आपली सेवा सुरू केली. कंपनीचे काम चांगले चालले होते, पण 2016 मध्ये रिलायन्स जिओने प्रवेश केला. जिओ येण्यापूर्वी व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेलचे टेलिकॉम इंडस्ट्रीत वर्चस्व होते.
पण जिओने सर्व काही बदलून टाकले. Jio लाँच होताच डेटाच्या किमतीत मोठी घट झाली. एक काळ असा होता की, एक जीबी डेटाची किंमत 250 रुपये होती. पण जिओच्या आगमनानंतर हाय स्पीड 4G डेटाची किंमत सुमारे 13 रुपये प्रति जीबीवर आली. जिओच्या आगमनानंतर एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाचे ग्राहक झपाट्याने कमी झाले. टेलिकॉम कंपन्यांमध्ये आपले ग्राहक वाचवण्यासाठी प्राइस वॉर सुरू झाले.
त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर आणि नफ्यावरही वाईट परिणाम झाला. 2017 मध्ये व्होडाफोन आणि आयडिया एकमेकांमध्ये विलीन झाले. यातून देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीचा जन्म झाला. परंतु कंपनीची स्थिती सतत खालावत गेली आणि ग्राहकांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. Jio आणि Airtel ने त्यांच्या 5G सेवा सुरू केल्या आहेत. पण व्होडाफोन आयडियाला आजतागायत तसे करता आलेले नाही.
31 डिसेंबर 2022 च्या आकडेवारीनुसार, वोडाफोन आयडियाचे देशात सुमारे 23 कोटी ग्राहक आहेत. पण यातील बहुतांश ग्राहक 2G आणि 3G आहेत. यामुळे कंपनीची प्रति युजर कमाई खूपच कमी आहे. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या रिपोर्टनुसार, दूरसंचार कंपन्या पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, शक्यतो जून 2024 मध्ये दर वाढवण्यास सुरुवात करतील.
टॅरिफ दर वाढीशिवाय व्होडाफोन आयडिया आवश्यक गुंतवणूक करू शकणार नाही आणि 5G सेवा सुरू करू शकणार नाही. पण, या दरवाढीमुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या आणखी कमी होईल. कंपनीवर 2.3 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. भांडवल उभारणीची त्यांची कोणतीही योजना प्रगतीपथावर नाही. त्यामुळे लवकरच त्याचे ऑपरेशन थांबवावे लागण्याची भीती आहे.