Vi ची कमाल, गुंतवणूकदार मालामाल! सप्टेंबर महिन्यात १०० टक्के रिटर्न; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 02:45 PM2021-10-03T14:45:43+5:302021-10-03T14:55:25+5:30

सप्टेंबर महिन्यात Vi कंपनीचा शेअर काही प्रमाणात सावरला असून, याचा फायदा गुंतवणूकदारांनाच झाला आहे.

Jio ला जोरदार टक्कर देण्यासाठी Vodafone आणि Idea यांनी एकत्र येत Vi या संयुक्त कंपनीची स्थापना केली. मात्र, आर्थिक आघाडी सावरण्यास कंपनीला अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये Vi ला एकामागून एक धक्के बसल्याचे पाहायला मिळत आहे.

मात्र, यातच अलीकडे मोदी सरकारने Vi सह अनेक दूरसंचार कंपन्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्ज तसेच अनेक देयके देण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना वेळ मिळणार आहे. याचा सर्वाधिक फायदा Vodafone Idea म्हणजेच Vi ला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

या निर्णयाचा सकारात्मक परिणाम शेअर मार्केटमध्ये दिसून आला असून, गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा Vi वर विश्वास दाखवला आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेला Vi कंपनीचा शेअर काही प्रमाणात सावरला असून, याचा फायदा गुंतवणूकदारांनाच झाला आहे.

Vi कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे डबल केल्याचे सांगितले जात आहे. ३१ ऑगस्ट रोजी Vi कंपनीचा शेअर ६.१० रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यातील आश्वासक घडामोडींचा चांगला परिणाम दिसून आला. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी Vi च्या शेअरची किंमत ११.९० रुपयांवर बंद झाला होता.

Vi कंपनीचा शेअर ३० सप्टेंबर रोजी १२ रुपये झाला होता. मात्र, बाजार संपताना त्यात काहीशी घसरण झालेली पाहायला मिळाली. Vi कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाल्यामागे कंपनीच्या प्रवर्तकांनी गुंतवणुकीची केलेली घोषणा आणि मोदी सरकारने AGR थकबाकीसाठी टेलिकॉम कंपन्यांना ४ वर्षांची दिलेली सूट ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

Vi कंपनीवर एकामागून एक संकट येत असताना गुंतवणूकदारांनीही पाठ फिरवली होती. त्यामुळे Vi कंपनीचा स्टॉक ४.५५ रुपयांवर खाली आला होता. आता मात्र Vi कंपनीवर पुन्हा एकदा गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता Vi च्या २७ कोटी ग्राहकांवरील टांगत्या तलवारीतून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने रिलीफ पॅकेजची घोषणा केली असून, सर्व दूरसंचार कंपन्यांना नियामक देयकावर चार वर्षांची स्थगिती मिळाली. दूरसंचार कंपन्यांना सुधारणा करण्यात यावी, यासाठी ९ उपायांची घोषणा केल्याचे सांगितले जात आहे.

३१ मार्च २०२१ पर्यंत Vi वरील एकूण थकबाकी १.९ लाख कोटी होते. तसेच एकूण आठ बँकांकडे Vi ची एकूण ४८ हजार कोटींचे कर्ज आहे. Vi ने विविध बँकांकडून २३ हजार कोटींचे थेट कर्ज घेतले असून, उर्वरित २५ हजार कोटींची हमी बँकांनी दिली आहे.

स्वयंचलित मार्गाने १०० टक्के एफडीआयचा मार्ग मोकळा केल्यामुळे Vi या वर्षी सुमारे १५ ते २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वाढवू शकेल, अशी बँकांना अपेक्षा आहे. Vi ला चालू आर्थिक वर्षात म्हणजेच बँकांना ९ हजार कोटी रुपये परत करायचे आहेत. यात ५ हजार कोटींच्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरचाही समावेश आहे.

Vi कडून ग्राहकांना उत्तम सेवा आणि चांगले पर्याय देणे सुरुच राहील. गेल्या वर्षभरात ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत त्यांनी आभार मानले. आगामी काळात Vi डिजिटल इंडियन आणि डिजिटल भारत या अभियानाच्यादृष्टीने सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान आणि सेवा पुरवण्याचा प्रयत्न करेल, असे रविंदर टक्कर यांनी म्हटले.

दरम्यानच्या काळात कंपनीची तातडीची आर्थिक गरज भागवण्यासाठी Vi चे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी स्वतःकडील २७ टक्के हिस्सा खासगी गुंतवणूकदारांना विक्री करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र त्याला केंद्र सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

केंद्र सरकारने या पत्रावर प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली. Vi कर्जबाजारी कंपनी आहे. तसेच व्यवसायात तोटाही होत आहे. त्यामुळे Vi कंपनीला BSNL एमटीएनएलमध्ये विलीन करू इच्छित नाही, असे मोदी सरकारने म्हटले. तसेच निती आयोगानेही या प्रस्तावाचा विरोध केला.