Wadia Group: देशातील सर्वात जुनी कंपनी कोणती? टाटा की बिर्ला? नाही, नाही... कल्पनाही केली नसेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 06:39 PM2022-02-15T18:39:26+5:302022-02-15T18:43:43+5:30

India's oldest Company Wadia group: देशातील सर्वात जुने उद्योग कोणते असे म्हटले तर तुम्हाला टाटा, बिर्ला, महिंद्रा आदी नावे आठवतील. रिलायन्स, अदानी तर आताचे आहेत. पण हे नाव तुम्हाला माहिती असूनही कधीच आठवणार नाही.

देशातील सर्वात जुने उद्योग कोणते असे म्हटले तर तुम्हाला टाटा, बिर्ला, महिंद्रा आदी नावे आठवतील. रिलायन्स, अदानी तर आताचे आहेत. पण हे नाव तुम्हाला माहिती असूनही कधीच आठवणार नाही. या कंपनीचे ब्रँड प्रसिद्ध आहेत, घराघरात वापरले जातात, परंतू तुम्हाला त्यांची मूळ कंपनी किती जुनी आहे, याचा आकडा वाचला तर धक्का बसेल. या कंपनीचा इतिहास जवळपास 286 वर्षांचा आहे.

तुम्ही वाडिया उद्योग समुहाचे नाव ऐकले असेल का? हो... या कंपनीची स्थापना 1736 मध्ये झाली होती. लोएजी नुसेरवानजी वाडिया (Loeji Nusserwanjee Wadia) यांनी तेव्हा जहाज बांधणीचा व्यवसाय सुरु केला. (The Wadia Group History)

वाडिया तेव्हा ब्रिटिशांच्या सैन्यासाठी जहाजे निर्माण करत होते. या कंपनीने पुढील १५० वर्षांत जवळपास ३५० जहाजे बांधली. यानंतर वाडियांच्या पुढच्या पिढीने उद्योग विस्तारत नेला.

वाडिया ग्रुपने 1863 मध्ये ट्रेडिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला. वाडिया कंपनीने बॉम्बे बुरमाह ट्रेडिंग कॉरपोरेशन लिमिटेड (BBTCL) ची स्थापना केली. सुरुवातीला ही कंपनी टीक आणि लाकडाचा व्यापार करायची. नंतर यात चहा, कॉफी आणि अन्य सामानाची भर पडत गेली.

आज घराघरात Bombay Dyeing च्या चादरी, उशा, पडदे वापरले जातात. या टेक्सटाईल कंपनीने 1879 मध्ये देशात व्यापार सुरु केला होता. तेव्हा मशीनवर कापड विनण्याचा उद्योग जोर धरू लागला होता. नौरोजी वाडिया यांनी सुरु केलेल्या या कंपनीने परत कधी मागे वळून पाहिले नाही.

आज बाजारात कित्येक बिस्किट कंपन्यांचे ब्रँड उभे राहिले आहेत. परंतू ब्रिटानिया आजही या स्पर्धेत टिकून आहे. तो देखील वाडिया ग्रुपचाच. १८९२ मध्ये कोलकातामध्ये 295 रुपये गुंतवून हा उद्योग सुरु झाला. तेव्हा कंपनी बिस्किट बनवायची. य़ानंतर ही कंपनी एका कडून दुसऱ्याकडे अशी करत करत शेवटी वाडियांनी विकत घेतली. 1918 मध्ये ही पब्लिक लिमिटेड कंपनी बनली. आज गुड डे बिस्किट घराघरात पोहोचले आहे.

वाडिया समूहाला सध्याच्या उंचीवर नेण्यात विद्यमान अध्यक्ष नुस्ली वाडिया यांचा मोलाचा वाटा आहे. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली. 1980 च्या दशकात, जेव्हा त्यांच्या वडिलांनी बॉम्बे डाईंगची विक्री करण्याची योजना आखली तेव्हा त्यांनी ते वाचवले आणि नंतर 1977 मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष बनले.

सध्या त्यांचा मुलगा नेस वाडिया कंपनीच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे. वाडिया समूहाला एक वेगळी व्यावसायिक कंपनी बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. GoAir सुरू करण्यात आणि ब्रिटानियाला समूहाचा एक भाग बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.