आयुष्यभर १ लाख रुपयांची पेन्शन हवीये? LIC ची ही पॉलिसी करेल तुमचं स्वप्न पूर्ण, खर्चाचं टेन्शन राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 08:29 AM2024-11-11T08:29:22+5:302024-11-11T08:54:30+5:30

LIC Pension Plan : निवृत्तीनंतर चांगली पेन्शन मिळावी, अशी प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीची इच्छा असते. एलआयसीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला पैशांचं टेन्शन राहणार नाही.

LIC Pension Plan : निवृत्तीनंतर चांगली पेन्शन मिळावी, अशी प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीची इच्छा असते. त्याचबरोबर असे अनेक लोक आहेत ज्यांना वयाच्या ५० किंवा ६० वर्षांनंतर आवश्यक खर्चासाठी ठराविक रक्कम हवी असते. जर तुम्हालाही निवृत्तीनंतर किंवा वयाच्या ६० व्या वर्षानंतर आलिशान आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता.

पेन्शनसाठी एलआयसीच्या अनेक पॉलिसी असल्या तरी त्यापैकी न्यू जीवन शांती प्लॅन (LIC New Jeevan Shanti Plan) खूप खास आहे. या प्लॅनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदाच पैसे गुंतवावे लागतील. मग काही काळानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन म्हणून ठराविक रक्कम मिळत राहील. म्हणजे निवृत्तीनंतरही नियमित कमाई सुरू होते, असं म्हणता येईल.

हा प्लॅन कोणीही घेऊ शकतो. मग ती व्यक्ती नोकरी करणारी असो वा व्यवसाय करणारी. मात्र, यासाठी किमान वय ३० वर्षे आणि कमाल ७९ वर्षे असलं पाहिजे. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितकी पेन्शनची रक्कम अधिक मिळते.

ही सिंगल प्रीमियम पॉलिसी आहे. म्हणजेच तुम्हाला एकदाच गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर आयुष्यभरासाठी पेन्शन मिळत राहिल. या योजनेअंतर्गत किमान १.५० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यापेक्षा जास्त रक्कम तुम्ही गुंतवू शकता. तुम्ही जितकी जास्त रक्कम गुंतवाल तितकी जास्त रक्कम तुम्हाला पेन्शन म्हणून मिळेल.

हा प्लॅन घेण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे सिंगल लाइफसाठी डेफर्ड अॅन्युइटी. दुसरा पर्याय म्हणजे जॉइंट लाइफसाठी डेफर्ड अॅन्युइटी. आपण दोनपैकी कोणताही पर्याय निवडू शकता.

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ५ वर्षांनी पेन्शन सुरू होते. जर तुमचं वय ४० वर्षे असेल तर वयाच्या ४५ व्या वर्षापासून पेन्शन सुरू होईल. जर तुमचं वय ५५ वर्षे असेल तर वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन सुरू होईल. ही पेन्शन आयुष्यभर मिळणार आहे.

समजा तुमचं वय ४५ वर्षे आहे. या पॉलिसीमध्ये तुम्ही सिंगल प्रीमियमअंतर्गत ११ लाख रुपये गुंतवता. ५ वर्षांनंतर म्हणजेच ५० वर्षांचे झाल्यावर तुमची पेन्शन सुरू होईल. तुम्हाला वर्षाला सुमारे एक लाख रुपये (९९,४४० रुपये) पेन्शन मिळेल.

त्याचबरोबर समजा तुम्ही हा प्लॅन वयाच्या ५५ व्या वर्षी खरेदी केला. तुम्ही एकाच प्रीमियमअंतर्गत ११ लाख रुपये गुंतवता. ५ वर्षांनंतर जेव्हा तुम्ही ६० वर्षांचे व्हाल तेव्हा तुमची पेन्शन सुरू होईल. त्यावेळी तुम्हाला पेन्शन म्हणून वार्षिक १,०२,८५० रुपये मिळतील. या प्लॅनमध्ये तुम्ही दर महिन्याला किंवा दर तीन महिन्यांनी किंवा दर ६ महिन्यांनी पेन्शन घेऊ शकता.

याशिवाय यात अन्य फायदेही मिळतात. प्लॅन घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला संपूर्ण रक्कम व्याजासह परत मिळते. ही पॉलिसी तुम्ही केव्हाही सरेंडर करू शकता. यामध्ये सरेंडर व्हॅल्यू इतर पॉलिसींपेक्षा जास्त असते. यामध्ये तुम्हाला लोनची सुविधाही मिळते. पॉलिसी सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर तुम्ही त्यावर कर्जही घेऊ शकता.