होम लोन घ्यायचेय...पण फिक्स रेट की फ्लोटिंग रेटचे घ्यावे? जाणून घ्या नाहीतर मोठे नुकसान होईल... By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 08:34 AM 2021-01-25T08:34:20+5:30 2021-01-25T08:38:38+5:30
Home loan Fixed or floting Rate: दोन्ही दरांमध्ये काय अंतर आहे, कोणत्या परिस्थितीत कोणता पर्याय निवडावा, यावर खाली माहिती देण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला कर्ज निवडताना उपयोग होईल. घर खरेदी करणे जेवढे गरजेचे असते तेवढेच कठीणही. एक चांगले घर शोधल्यानंतर ते विकत घेण्यासाठी चांगले, परवडणारे कर्ज घेणे आव्हानात्मक असते. यावेळी तुम्ही बँक जरी निवडली तरीही त्यामध्ये दोन पर्याय असतात. एक म्हणजे फिक्स रेट आणि दुसरा फ्लोटिंग रेट.
दोन्ही दरांमध्ये काय अंतर आहे, कोणत्या परिस्थितीत कोणता पर्याय निवडावा, यावर खाली माहिती देण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला कर्ज निवडताना उपयोग होईल.
फिक्स्ड होम लोनमध्ये बँका सुरुवातीलाच व्याजदर निश्चित करतात. हा व्याजदर संपूर्ण कर्ज फिटेपर्यंत राहतो. हे एकप्रकारचे निश्चिंत करणारे कर्ज आहे. कारण तुम्हाला हप्ता किती पडेल याची माहिती आधीच असते.
फिक्स्ड होम लोनमुळे तुम्हाला तुमचे बजेट आणि आर्थिक गुंतवणुकीच्या योजना बनविण्यास मदत मिळते. फिक्स्ड लोन रेटची किंमत फ्लोटिंगपेक्षा थोडी जास्तच असते.
जर हे अंतर जास्त असेल तर मग फ्लोटिंग रेटचा विचार करता येईल. जर अंतर कमी असेल तर फिक्स्ड रेटच चांगला पर्याय ठरू शकतो.
फ्लोटिंग रेट हा बाजारातील व्याजदरानुसार बदलत राहतो. जर बेंचमार्क रेटमध्ये वाढ झाली तर व्याजही वाढते. सहाजिकच हप्ताही वाढतो.
फिक्स्ड रेट कधी घ्यावा.... जर तुमचा ईएमआय पगाराच्या 25 ते 30 टक्क्यापर्यंतच असेल. भविष्यात व्याजदर वाढण्याचा अंदाज असेल आणि होम लोन सध्याच्या व्याजदरावर लॉक करू इच्छित असाल तर.
नजिकच्या काळात व्याजदर कमी झाले असतील आणि सध्याचे व्याजदर तुम्हाला परवडणारे असतील तर फिक्स्ड रेटचा फायदा होईल. सध्या एसबीआयचे होम लोन दर 7-7.5 टक्के झाले आहेत.
फ्लोटिंग रेट कधी घ्यावा... जर तुम्ही काळाबरोबर व्याज दर कमी होण्याची आशा करत असाल तर हा रेट फायद्याचा ठरू शकतो. जर व्याजदर कमी-जास्त झाले तर त्याचा परिणाम तुम्हाला जाणवत नसेल तरच हा पर्याय निवडावा.
जर तुम्हाला नजिकच्या काळात वाचलेल्या व्याजातून काही बचत करायची आहे तर फ्लोटिंग रेट निवडावा. जो फिक्स रेटपेक्षा कमी आहे.