Want to get Loan : कर्ज मिळणार की नाही, हे नेमके कशावरून ठरते? By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:31 AM 2022-12-20T11:31:53+5:30 2022-12-20T11:40:17+5:30
जाणून घ्या यासाठी वित्तीय संस्था नक्की कोणता निकष तपासून पाहतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असल्यास बँका आणि वित्तीय संस्था आधी तुमचा सिबिल स्कोअर तपासून घेतात. स्कोअर कमी असेल, तर कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. प्रसंगी कर्ज नाकारलेही जाऊ शकते.
वित्तीय क्षेत्रात नोकरी करण्यासाठीही आता सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. कारण अनेक कंपन्या उमेदवाराचा सिबिल स्कोअर तपासतात. आपला सिबिल स्कोअर चांगला कसा ठेवावा, याची माहिती घेऊ या.
सिबिल स्कोअर हा ३०० ते ९००च्या आतील आकडा असतो. सिबिलच्या रिपोर्टमध्ये एखाद्याची संपूर्ण आर्थिक कुंडलीच असते. तुमच्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण इतिहास त्यात असतो.
सिबिल म्हणजे काय? सिबिल हे ‘क्रेडिट इंफॉर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेड’चे लघुरूप आहे. ही रिझर्व्ह बँकेला माहिती देणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. याशिवाय भारतात इक्विफॅक्स, एक्सपेरियन आणि सीएफआय हायमार्क या कंपन्याही क्रेडिटबाबत माहिती देतात.
सिबिल स्कोअर हे आवश्यक - वेळेत भरा ईएमआय : कर्ज घेतले असल्यास त्याचे हप्ते (ईएमआय) नियमित भरा.
क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या : क्रेडिट कार्डाचे बिल वेळेवर भरले नाही, तर सिबिल स्कोअर कमी होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या व बिल वेळेवर अदा करा.
झेपेल तेवढेच कर्ज घ्या : आवाक्या बाहेर जास्तीचे कर्ज घेऊन हप्ते वाढवून घेऊ नका.
वारंवार सिबिल स्कोअर तपासू नका : मोबाइल ॲपद्वारे आता सिबिल स्कोअर पाहता येतो, पण वारंवार सिबिल स्कोअर तपासू नका. कारण त्यामुळे सिबिल स्कोअर कमी होतो.
सामाईक खात्यापासून राहा सावध : सामाईक खाते (जॉइंट अकाउंट) उघडण्याचे टाळा. कारण तुमच्या सहकाऱ्याने कर्ज घेऊन थकविल्यास तुमचा सिबिल स्कोअरही बाधित होऊ शकतो. याशिवाय कर्जाला जामीन राहताना काळजी घ्या. कारण थकीत कर्जाच्या जामीनदाराचा सिबिलही खराब होतो.