Income Tax Raid: आयकर विभाग छापे टाकतो म्हणजे काय करतो? सिक्रेट तयारी; तोड-फोड... तुमचे अधिकार काय... By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:57 PM 2023-02-16T12:57:09+5:30 2023-02-16T13:04:13+5:30
Income Tax Raid: आयकर विभाग छापे टाकताना काय तयारी करतो? तुम्हाला काय आहेत? ते जाणून घेऊया... Income Tax Raid: देशभरात अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभाग म्हणजेच आयकर विभागाचे धाडसत्र सुरू आहे. अलीकडेच BBC च्या दिल्ली आणि मराठी येथील कार्यालयांवर आयकर विभागाने छापा टाकला. ईडी, आयकर विभाग तसेच सीबीआयच्या कारवायांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार सडकून टीका करत आहेत. मात्र, आयकर विभाग छापे टाकतो म्हणजे काय करतो? कशी तयारी केली जाते? तुम्हाला कायद्याने काय अधिकार दिले आहेत? ते जाणून घेऊया...
आयकर विभाग आयकर कायदा १९६१ च्या कलम १३२ अंतर्गत कोणतेही सर्वेक्षण, छापा टाकतो. हा कायदा करपात्र उत्पन्न, कर दायित्व, अपील, दंड आणि खटला संदर्भात आहे. या कायद्यात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे अधिकार आणि कर्तव्येही परिभाषित करण्यात आली आहेत. या कायद्यात वेळोवेळी सुधारणाही करण्यात आल्या आहेत.
आयकर विभाग देशाच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. हा विभाग आयकरात फसवणूक करणाऱ्या लोकांना शोधून काढतो. म्हणजे ज्या लोकांचे उत्पन्न आणि करात फरक आहे. किंवा ज्या लोकांवर करचुकवेगिरीचा संशय आहे. किंवा ज्यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता किंवा काळा पैसा असल्याची गुप्त माहिती असते, अशा सर्व प्रकरणात आयकर विभाग छापे टाकतो.
आयकर विभाग एखाद्या व्यक्तीच्या घरावर, कार्यालयावर किंवा कोणत्याही संस्थेवर किंवा परिसरावर छापे टाकण्याची योजना आखतो, तेव्हा त्याची माहिती कुणालाही कळू नये यासाठी ते प्रयत्न करतो. ज्या व्यक्ती किंवा संस्थेवर छापा टाकला जाणार आहे, त्या व्यक्तीला याची कल्पना नसावी. जेणेकरून त्याला सावरण्याची संधी मिळणार नाही, अशी यामागची भूमिका असते.
आयकर विभागाची टीम छापेमारी करताना सर्च वॉरंटही आणते. पहाटे किंवा रात्री उशिरा छापा टाकला जातो. या वेळी कारवाईदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पोलिसांचे पथकही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत असते. अगदीच मोठ्या छापेमारीच्या वेळेस किंवा परिस्थितीनुसार, निमलष्करी दलाला पाचारण केले जाते.
आयकर विभागाची टीम एखाद्या व्यक्तीच्या घरावर, कार्यालयावर किंवा संस्थेवर छापा टाकते तेव्हा सर्वप्रथम ते तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मोबाईल फोन जप्त करतात. यानंतर त्या घराचे किंवा परिसराचे सर्व दरवाजे बंद केले जातात. कारवाईदरम्यान घराबाहेर पडता येत नाही किंवा बाहेरील कोणाला आत येता येत नाही. आयकर विभागाच्या टीममध्ये महिला अधिकारी आणि कर्मचारी असतात. गरज पडल्यास घटनास्थळी उपस्थित महिलांची झाडाझडती घेता येऊ शकेल.
ज्या ठिकाणी छापा टाकला जात जातो, त्या ठिकाणी असलेली रोख रक्कम, दागिने आणि मौल्यवान वस्तूंची खाती आणि कागदपत्रे तपासली जातात. आवश्यकता असल्यास, प्राप्तिकर विभागाची टीम त्या वस्तूशी संबंधित कागदपत्रेही सोबत घेऊन जाऊ शकते. एखाद्या दुकानात किंवा शोरूमवर छापा टाकला जात असेल तर तेथे विक्रीसाठी ठेवलेला माल आयकर अधिकाऱ्यांना जप्त करता येत नाही. पण त्या वस्तूंची माहिती नोंदवून घेता येते. तसेच त्या मालाशी संबंधित कागदपत्रे जप्त करता येतात. छापेमारीत रोख किंवा दागिने सापडले आणि त्याचा हिशोब त्या व्यक्तीकडे असेल तर अधिकारी तेही जप्त करत नाही.
छाप्यादरम्यान कोणत्याही ठिकाणाहून बेहिशेबी पैसे किंवा दागिने आढळून आल्यास, त्याचे दस्तऐवज व्यक्ती किंवा संस्थेकडे त्यावेळी उपलब्ध नसतील तर आयकर विभागाचे पथक ते जप्त करू शकतात. पैसे जप्त केल्यानंतर ते थेट बँकेत जातात आणि सरकारी खात्यात जमा होतात.
नंतर तपासात जर कर दायित्व निर्माण झाले. त्यानंतर त्याचे मूल्यांकन होते. कराची रक्कम मूल्यांकनानंतर बाहेर येते, ते न्यायाधिकरणात नेली जाते. यानंतर शिल्लक राहिलेले पैसे व्याजासह परत केले जातात. काही प्रकरणांमध्ये प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत विभागाचे पथक अशी रक्कम ठेवते.
कोणत्याही ठिकाणी छापे टाकण्याची कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयकर विभागाचे अधिकारी पूर्ण नियोजन करतात. संबंधित पथकाव्यतिरिक्त विभागातील लोकांनाही याचा सुगावा लागत नाही. अशा ऑपरेशनसाठी गुप्त कोड शब्द वापरला जातो. छाप्यादरम्यान कोणतीही व्यक्ती आयकर अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणू शकत नाही. त्यांना विरोधही करू शकत नाही.
जर कोणी आयकर विभागाच्या टीमला विरोध केला किंवा त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. जेथे छापे टाकले जातात, तेथे अधिकारी उपस्थित सर्व लोकांना त्यांच्या नात्याबद्दल विचारतात. सर्व मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे मागवली जातात. संबंधित व्यक्तीकडे लॉकर असेल तर त्याची चावीही द्यावी लागते.
घर, कार्यालय किंवा परिसरात छापेमारी करताना उपस्थित असलेली कोणतीही व्यक्ती कोणतेही कागदपत्र फाडण्याचा किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. कारवाईदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांच्या प्रश्नांनाही त्याला उत्तरे द्यावी लागतात. तसे न केल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
जर घर, कार्यालय किंवा कंपनीवर छापे मारण्याची कारवाई केली जात असेल, तर तेथे राहणारे लोक तपासाच्या उद्देशाने आयकर अधिकार्यांकडून वॉरंट आणि त्यांची ओळखपत्रे मागू शकतात. ज्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या घरावर छापा टाकला जात आहे, ती कोणत्याही दोन सन्माननीय व्यक्तींना साक्षीदार म्हणून बोलावू शकते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांना बोलावले जाऊ शकते.
ज्या ठिकाणी छापेमारी केली जात आहे, तेथे लहान मुले असतील आणि त्यांना शाळेत जायचे असेल तर त्यांच्या दप्तरांची तपासणी करून त्यांना शाळेत पाठवले जाऊ शकते. घरात किंवा परिसरात उपस्थित असलेल्या लोकांना नियमित आणि वेळेवर जेवण, अन्न पदार्थ, खाणे आणण्यापासून रोखता येत नाही. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्ती किंवा कंपनीला निवेदनाची प्रत घेण्याचा अधिकार आहे.
जर आयकर विभागाच्या पथकाला काही मोठ्या गडबडीचे पुरावे मिळाले किंवा संशय आल्यास तेथे उपस्थित आयकर अधिकारी कडक कारवाई करू शकतात. घर, आवारात किंवा कार्यालयात पुरावे आणि माहिती गोळा करण्यासाठी कुलूप तोडणे, भिंत पाडणे अशा प्रकारची कारवाई करू शकतात.