Noel Tata Net Worth: रतन टाटांचे उत्तराधिकारी बनलेल्या नोएल टाटांची नेटवर्थ किती, कुटुंबात कोण-कोण आहेत? जाणून घ्या By जयदीप दाभोळकर | Published: October 12, 2024 08:52 AM 2024-10-12T08:52:37+5:30 2024-10-12T09:11:02+5:30
Noel Tata Net Worth: टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये ६६ टक्के हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्टच्या नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. पाहूया कोण आहेत त्यांच्या कुटुंबात आणि किती आहे त्यांची नेटवर्थ. Noel Tata Net Worth: टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये ६६ टक्के हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्टच्या नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
६७ वर्षीय नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत. त्यांना रतन टाटा यांचे उत्तराधिकारी बनवलं जाईल, असं मानलं जात होतं आणि ट्रस्टनं शुक्रवारी त्यास मंजुरी दिली. लाइमलाइटपासून दूर राहून शांतपणं आपलं काम करायला आवडणारी व्यक्ती म्हणून नोएल यांची ओळख आहे.
नोएल टाटा यांचा जन्म १९५७ मध्ये झाला असून ते नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी ब्रिटनमधील ससेक्स विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि नंतर फ्रान्समधील जगातील अव्वल बिझनेस स्कूलपैकी एक असलेल्या इनसेड मधील प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी कार्यक्रमात भाग घेतला.
टाटा समूहातील टाटा इंटरनॅशनलमध्ये त्यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. ही कंपनी टाटांचा परदेशातील व्यवसाय पाहते. जून १९९९ मध्ये त्यांची टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंटचे एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या कंपनीची स्थापना त्यांची आई सिमोन टाटा यांनी केली होती.
ट्रेंटला उंचीवर आणण्याचं श्रेय नोएल टाटा यांना जातं. आज कंपनीचं मार्केट कॅप २,९३,२७५.३८ कोटी रुपये आहे. यामुळे टाटा समूहात नोएल यांचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढली. २००३ मध्ये ते टायटन इंडस्ट्रीज आणि व्होल्टासच्या संचालक मंडळात सामील झाले. २०१० मध्ये त्यांची टाटा इंटरनॅशनलच्या एमडीपदी नियुक्ती झाली.
रतन टाटा यांच्या जागी टाटा समूहाच्या प्रमुखपदी त्यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा त्यावेळी होती. पण २०११ मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळानं सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी निवड केली. सायरस मिस्त्री यांची बहीण आलू मिस्त्री यांनी नोएल टाटा यांच्याशी विवाह केला आहे.
या निर्णयानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला पण नोएल शांतपणे आपलं काम करत होते. २०१६ मध्ये मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आणि रतन टाटा थोड्या काळासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून परतले. दरम्यान, एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नोएल यांची २०१८ मध्ये सर रतन टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. रतन टाटा यांच्या निधनानंतर आता त्यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. पण ते टाटा सन्सचे चेअरमन होऊ शकत नाहीत.
याचं कारण म्हणजे सन २०२२ मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळानं एकमतानं आपल्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये सुधारणा केली. त्यानुसार एकाच व्यक्तीला ही दोन पदे भूषविता येणार नाहीत. रतन टाटा हे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष पद भूषवणारे शेवटचे व्यक्ती होते. म्हणजेच नोएल टाटा यापुढे टाटा सन्सचे चेअरमन होऊ शकणार नाहीत. त्यासाठी त्यांना टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची खुर्ची सोडावी लागेल.
नोएल टाटा आणि आलू टाटा यांना माया, नेव्हिल आणि लेह अशी तीन मुलं आहेत. नोएल टाटा यांचा मुलगा नेव्हिल टाटा २०१६ मध्ये ट्रेंटमध्ये रुजू झाले आणि नुकताच त्यांनी स्टार बझारचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नोएल टाटा यांच्या मुलींचाही टाटा समूहातील कंपन्यांमध्ये समावेश आहे.
३९ वर्षीय लिआ टाटा यांच्याकडे नुकतीच इंडियन हॉटेल्समध्ये गेटवे ब्रँडची जबाबदारी देण्यात आली होती. तर ३६ वर्षीय माया टाटा यांना अॅनालिटिक्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये रस आहे. त्या टाटा डिजिटलमध्ये काम करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोएल टाटा यांची नेटवर्थ १.५ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास १२,४५५ कोटी रुपये आहे.