चुकून भलतीकडेच पैसे ट्रान्सफर झाले तर काय करायचं? जाणून घ्या सोप्या शब्दांत...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:28 AM2022-04-12T11:28:58+5:302022-04-12T11:34:50+5:30

एखाद्या साध्या चुकीमुळे तुमचे पैसे भलत्याच खात्यात जमा केले गेले तर ते पैसे परत मिळवणे त्रासदायक ठरते. अशा वेळी काय करावे?

नेट बँकिंग आणि यूपीआय वॉलेटच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण ही हल्ली सामान्य बाब झाली आहे. नातेवाईक, मित्र परिवार तसेच दुकानदारांना पैसे देण्यासाठी लोक याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. ही पद्धत अतिशय सोपी आणि जलद असते. परंतु एखाद्या साध्या चुकीमुळे तुमचे पैसे भलत्याच खात्यात जमा केले गेले तर ते पैसे परत मिळवणे त्रासदायक ठरते. अशा वेळी काय करावे?

ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे तिचा अकाऊंट नंबर अचूकपणे टाकणे ही पैसे पाठविणाऱ्याची जबाबदारी आहे. ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे तिचे नाव पेमेंट इन्स्ट्रक्शन्स आणि फंड ट्रान्सफरच्या मेसेजमध्ये नमूद केले जावे.

१. ऑनलाइन - एनईएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएस. २. ऑफलाइन - बँकेत जाऊन पावती भरून पैसे ट्रान्सफर करणे. ३. यूपीआय - पेटीएम, फोन पे आणि भीम यांसारखे ॲप्लिकेशन्स.

१. प्रथम कस्टमर केअरला फोन करून कळवावे. ते आपला तपशील मागवून पुढील सूचना देतील. २. तातडीने आपल्या बँकेत जाऊन याची माहिती मॅनेजरला द्यावी. ३. चुकीच्या खात्या पैसे जमा केल्याबाबत स्क्रीनशॉटसह बँकेत अर्ज द्यावा.

४. ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा झाले त्या व्यक्तीचा फोन नंबर बँकेकडून मिळवावा. ५. त्यास पैसे परत देण्याची विनंती करावी.

अशा स्थितीत कायदेशिर कारवाई करणे हा एकच पर्याय शिल्लक उरतो. यासाठी बँकेत रीतसर तक्रार करावी. कोर्टाद्वारे व्यक्तीला नोटीस पाठवून कारवाई करता येते.

अशा प्रकारात बँकेचीच मदत घ्यावी लागेल. तुमचे आणि त्या व्यक्तीचे खाते एकाच बँकेत असेल तर बँक त्या व्यक्तीला पैसे परत करण्याची विनंती करू शकते. ती व्यक्ती तयार असल्यास पैसे ७ दिवसात परत मिळू शकतात.

तुमचे आणि त्या व्यक्तीचे खाते वेगवेगळ्या बँकांमध्ये असेल तर तुम्हाला रिसिव्हरच्या बँकेत जाऊन मॅनेजरची भेट घ्यावी लागेल. ते मॅनेजर तुम्हाला पुढची मदत करू शकतात. पैसे परत करण्याची प्रक्रिया रिसिव्हरचे खाते ज्या बँकेत असेल तिलाच पार पाडावी लागते.