स्टेट बँक ऑफ इंडियाचे आधीचे नाव काय होते? स्थापना कधी अन् कशी झाली? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 16:41 IST2024-12-09T16:22:06+5:302024-12-09T16:41:34+5:30

State Bank of India History : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आहे, हे सर्वांना माहीत असेलच. परंतु तुम्हाला माहिती आहे का? स्टेट बँक ऑफ इंडियाची खरी ओळख दुसरीच होती. ही बँक स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा एसबीआय म्हणून ओळखली जात नव्हती. तर त्यासंबंधी जाणून घ्या...

एसबीआय स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर, एक खाजगी बँक होती, जी इम्पीरियल बँक म्हणून ओळखली जात होती. पण, 1955 मध्ये, तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असे बदलले आणि तिचे राष्ट्रीयीकरण करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत रूपांतरित करण्यात आले.

आणखी एक खास गोष्ट म्हणजे इम्पीरियल बँक सुद्धा 3 बँकांच्या विलीनीकरणाने स्थापन झाली होती. या तीन बँकांमध्ये 18 व्या शतकात ब्रिटीश भारताच्या काळात स्थापन झालेल्या बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या होत्या.

27 जानेवारी 1921 रोजी या तीन बँकांचे विलीनीकरण करून इम्पीरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली, जी एक अखिल भारतीय बँक होती. नंतर स्वातंत्र्यानंतर, 1 जुलै 1955 रोजी इम्पीरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले आणि ती स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाऊ लागली.

1959 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (सहायक बँक) कायदा मंजूर झाल्यामुळे, राज्यांशी संबंधीत आठ पूर्वीच्या बँका देखील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहायक बँका बनल्या. मात्र, नंतर हळूहळू त्या बँका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाल्या.

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा, इम्पीरियल बँकेचा एकूण भांडवली आधार (रिझर्व्हसह) 11.85 कोटी रुपये होता. ठेवी आणि आगाऊ रक्कम अनुक्रमे 275.14 कोटी आणि 72.94 कोटी होती.

याशिवाय, देशभरात एकूण 172 ब्रांच आणि 200 हून अधिक उप-कार्यालये होती. दरम्यान, आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आर्थिक अहवालानुसार, बँकेची एकूण मालमत्ता ₹70.415 ट्रिलियन आहे.