Investment Plans: तुमची रक्कम केव्हा होईल दुप्पट, तिप्पट आणि चौपट? 'या' फॉर्म्युलानं कॅलक्युलेट करा आणि मग गुंतवणूक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 09:32 AM2024-07-25T09:32:50+5:302024-07-25T09:39:59+5:30

Investment Plans: सुरक्षित भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. परंतु त्या गुंतवणूकीतून नफा मिळवायचा असेल तर ती गुंतवणूक योग्य ठिकाणी करणं आवश्यक आहे.

सुरक्षित भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. परंतु त्या गुंतवणूकीतून नफा मिळवायचा असेल तर ती गुंतवणूक योग्य ठिकाणी करणं आवश्यक आहे. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करताना आपल्या सर्वांच्या मनात एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे नफा.

किती काळ गुंतवणूक केल्यानंतर त्या योजनेत आपल्याला किती नफा मिळेल याची कल्पना आली तर गुंतवणुकीचा निर्णय घेणं सोपं जाईल. आपली रक्कम दुप्पट, तिप्पट आणि चौपट केव्हा होईल हे सहज सांगू शकणारा एक फॉर्म्युला आपण जाणून घेऊ. अशा वेळी तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेऊ शकता.

पहिला फॉर्म्युला म्हणजे Rule of 72. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यातून तुमची रक्कम किती काळात दुप्पट होईल हे समजतं. बहुतेक तज्ज्ञ हे मोजणीसाठी बऱ्यापैकी अचूक फॉर्म्युला मानतात. हा फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एखाद्या योजनेवर मिळणाऱ्या वार्षिक व्याजाची माहिती असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला त्या व्याजाला ७२ ने डिव्हाईड करावी लागेल. यामुळे तुमचे पैसे दुप्पट होण्यास किती वेळ लागेल हे कळते.

उदाहरणार्थ, समजा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एफडीवर ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली. सध्या त्यावर ७.५ टक्के दरानं व्याज मिळत आहे. अशा वेळी सध्याच्या व्याजदराची ७२ ने विभागणी केल्यास त्याचं उत्तर ७२/७.५=९.६ असं असेल. अशा प्रकारे हिशोबानुसार तुमचे पैसे ९ वर्ष ६ महिन्यांत म्हणजेच जवळपास १० वर्षात दुप्पट होतील.

तिप्पट कधी होतील? तुमचे पैसे कधी तिप्पट होतील हे जाणून घ्यायचं असेल तर ११४ चा नियम तुमच्यासाठी काम करेल. हा फॉर्म्युला नियम ७२ सारखाच असून त्याच पद्धतीनं याची गणना केली जाते.

पोस्ट ऑफिस एफडीचे ही उदाहरण येथेही घेऊया. पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये तुमचे पैसे किती वेळात तिप्पट होतील हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ११४/७.५ हा फॉर्म्युला वापरावा लागेल. हिशोब केल्यावर उत्तर येईल १५.२ म्हणजेच ७.५% व्याजदरानुसार तुमचे गुंतवलेले पैसे १५ वर्ष २ महिन्यांत तिप्पट होतील.

रक्कम चौपट होईल? १४४ चा नियम तुम्हाला सांगतो की एखाद्या योजनेत तुमची रक्कम किती वेळात चौपट होईल. समजा तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवणूक करत असाल ज्यावर ६ टक्के दरानं व्याज मिळत असेल तर १४४/६=२४ म्हणजे तुमची रक्कम २४ वर्षात चौपट होईल. व्याजदर ७.५ टक्के असेल तर रक्कम चौपट होण्यास १९ वर्षे २ महिने लागतील आणि व्याजदर ८ टक्के असेल तर १८ वर्षांत रक्कम चौपट होईल.