कुठून आलं Ghibli ॲनिमेशन, कोण आहेत त्याचे मालक? नेटवर्थ ऐकून अवाक् व्हाल

By जयदीप दाभोळकर | Updated: March 31, 2025 09:11 IST2025-03-31T09:02:47+5:302025-03-31T09:11:38+5:30

Ghibli Animation Origin & Who Owns Studio Ghibli: सध्या सोशल मीडियावर घिबली आर्ट (Ghibli Art) अॅनिमेशन ट्रेंड करत आहे. एआय प्लॅटफॉर्म चॅटजीपीटीच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक व्यक्ती फोटोवरून अॅनिमेशन बनवत आहे.

सध्या सोशल मीडियावर घिबली आर्ट (Ghibli Art) अॅनिमेशन ट्रेंड करत आहे. एआय प्लॅटफॉर्म चॅटजीपीटीच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक व्यक्ती फोटोवरून अॅनिमेशन बनवत आहे. यापूर्वी हे फीचर प्रीमियम युजर्ससाठी होतं. पण आता फ्री युजर्स घिबली अॅनिमेशनही तयार करू शकतात. हे गिबली अॅनिमेशन कुठून आलं माहीत आहे का? त्याचे संस्थापक कोण आहेत आणि त्यांची नेटवर्थ किती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

'घिबली'चं कनेक्शन जपानशी आहे. याचं श्रेय हयाओ मियाझाकी (Hayao Miyazaki) आणि त्यांचा स्टुडिओ घिबली यांना जाते. ते घिबली स्टुडिओचे संस्थापक आहेत. मियाझाकी हे जपानी अॅनिमेशन विश्वाचा बादशहा मानले जातात. त्यांचे सिनेमे जगभर पसंत केले जातात. त्यांनी २५ हून अधिक अॅनिमेटेड चित्रपट आणि टीव्ही मालिका बनवल्या आहेत. स्पिरिटेड अवे (Spirited Away) हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटानं जगभरात २७५ मिलियन डॉलर (२३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त) कमाई केली होती.

स्टुडिओ घिबलीने आपल्या भन्नाट अॅनिमेशन चित्रपटांमधून भरपूर पैसे कमावले आहेत. त्यामुळे हा जगातील सर्वात मोठा अॅनिमेशन स्टुडिओ बनलाय. मियाझाकी यांच्या नेतृत्वाखाली स्टुडिओ घिबलीनं अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे जे प्रदर्शनाच्या वेळी जपानचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरलेत.

स्टुडिओ घिबली केवळ अॅनिमेशनमधूनच नव्हे तर त्याच्या उत्पादनांमधून (जसे की खेळणी आणि कपडे), डीव्हीडी विक्री आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग हक्कांमधून देखील बरेच पैसे कमवते. म्हणूनच मियाझाकी अॅनिमेशन इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.

सध्या चॅटजीपीटी प्लॅटफॉर्म युजर्ससाठी घिबली अॅनिमेशन तयार करत आहे. असे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, ज्यात लोक आपल्या आठवणी आणि चित्रपटातील दृश्ये घिबली स्टाईलमध्ये दाखवत आहेत. येत्या काळात एआयची आणखी साधनंही अशा इमेज आणि व्हिडिओ तयार करू शकतात. यामुळे स्टुडिओ घिबली आणि मियाझाकींच्या नेटवर्थवर परिणाम होऊ शकतो, असं मानलं जात आहे.

एआय प्लॅटफॉर्मवरून बनवलेली घिबली स्टाईल लोकांना नक्कीच खूप आवडते, पण मियाझाकी त्यावर खूश नाही. चॅटजीपीटीच्या या नव्या सॉफ्टवेअर अपडेटवर मियाझाकीच नव्हे तर इतर अनेक कलाकारांनी टीका केली आहे. त्याचा परिणाम आपल्या कलेवर आणि वर्षानुवर्षांच्या मेहनतीवर होईल, असं त्यांचं म्हणणं आहे.

मियाझाकी यांनी एआयला जीवनाचा अपमान म्हटलं आहे. त्यांचा असा विश्वास आहे की एआय मानवी भावना समजून घेऊ शकत नाही, जे पारंपारिक अॅनिमेशनमध्ये घडतं. त्यांचा असा विश्वास आहे की एआयमध्ये मानवी क्रिएटिव्हिटीचा अभाव आहे.