Post Office Scheme : Post Officeच्या कोणत्या स्कीममध्ये मिळतो सर्वाधिक फायदा? या महिन्यात गुंतवणूकीचा प्लान आहे? चेक करा व्याजदर By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 08:49 AM 2024-09-03T08:49:40+5:30 2024-09-03T09:02:49+5:30
Post Office Scheme : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. परंतु योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पोस्ट ऑफिसच्या योजनांवर मिळणाऱ्या व्याजामध्ये सरकार दर तीन महिन्यांनी सुधारणा करते. Post Office Investment: भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. परंतु योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. अनेक जण गुंतवणूकीसाठी बाजाराकडे वळतात. तर काही जण गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय शोधत असतात. पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
पोस्ट ऑफिसच्या योजनांवर मिळणाऱ्या व्याजामध्ये सरकार दर तीन महिन्यांनी सुधारणा करते. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जुलै ते सप्टेंबर) सरकारनं कोणत्याही पोस्ट ऑफिस योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. अशा तऱ्हेने लोक आता ऑक्टोबरची वाट पाहत आहेत. १ ऑक्टोबरला पुन्हा एकदा सरकार या योजनेच्या व्याजदरात बदल करणार आहेत. अशा परिस्थितीत अल्पबचत योजनेला नवे व्याजदर लागू होऊ शकतात.
सरकारनं बराच काळ पीपीएफवरील व्याजदरात बदल न केल्यानं लोक पीपीएफची सर्वाधिक वाट पाहत आहेत. आता गुंतवणूकदार या योजनेतील वाढीव व्याजदराची वाट पाहत आहेत. कोणत्या पोस्ट ऑफिस योजनेवर सध्या किती व्याज मिळत आहे हे आपण जाणून घेऊ. जर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर कोणत्या योजनेत तुम्हाला सर्वात जास्त फायदा मिळू शकतो.
पोस्ट ऑफिस बचत खात्यावर ४%, एका वर्षाच्या टाईम डिपॉझिटवर ६.९%, २ वर्षाच्या टाईम डिपॉझिटवर ७%, ३ वर्षाच्या टाईम डिपॉझिटवर ७.१%, ५ वर्षाच्या टाईम डिपॉझिटवर ७.५%, ५ वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिट अकाउंटवर ६.७%, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ८.२%, मंथली इन्कम स्कीमवर ७.४%, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीमवर ७.१%, सुकन्या समृद्धी खात्यावर ८.२%, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर ७.७%, किसान विकास पत्रावर ७.५%, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ७.५% व्याज मिळत आहे.
यातील काही योजनांचे पर्याय तुम्हाला बँकेत मिळतील, तर काही योजना पोस्ट ऑफिसमध्येच उघडता येतील. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, मंथली इनकम स्कीम अशा योजना आहेत ज्यात तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन गुंतवणूक करावी लागते.
एनएससी आणि एमएसएससी हे दोन्ही मुदत ठेवीसारखे आहेत. कोणताही भारतीय नागरिक एनएससीमध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही पोर्टफोलिओत यायोजनेचा समावेश आहे. त्याचबरोबर महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी एमएसएससी चालवली जाते. या योजनेत दोन वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या योजनेत गुंतवणूक केली आहे.
त्याचबरोबर एमआयएस योजना ही दरमहा नियमित उत्पन्न मिळविण्याची योजना आहे. या योजनेत एका खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यावर जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करता येतात. ही रक्कम ५ वर्षांसाठी जमा केली जाते. यामध्ये ७.४ टक्के दराने पैसे दिले जातात.