Post Officeच्या कोणत्या स्कीमवर मिळेल 'अधिक' व्याज, गुंतवणूकीपूर्वी पाहा प्रत्येक योजनेचे इंटरेस्ट रेट By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 08:46 AM 2024-09-16T08:46:56+5:30 2024-09-16T09:01:24+5:30
Post Office Investment Scheme : पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीच्या विविध योजना उपलब्ध आहेत. या सर्व योजनांमध्ये गुंतवणुकीवर जास्त व्याजासह अनेक सुविधा दिल्या जातात. पोस्ट ऑफिस योजनेतील व्याजदरात दर तिमाहीला सुधारणा केली जाते. Post Office Small Saving Scheme : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. हल्ली अनेक जण गुंतवणूकीकडेही वळत आहे. पोस्ट ऑफिस गुंतवणूकीचे अनेक पर्याय देत आहे. याशिवाय यातील गुंतवणूक ही सुरक्षितही मानली जाते. पोस्ट ऑफिस स्कीम्स गुंतवणुकीसाठी खूप चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीच्या विविध योजना उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात असेल.
पोस्ट ऑफिस योजनेचे व्याजदर दर तिमाहीला अपडेट केले जातात. होय, व्याजदरात दर तीन महिन्यांनी बदल होत असतात. चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीतील म्हणजेच जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील व्याजदरही यापूर्वी अपडेट करण्यात आले होते. सप्टेंबर अखेरपर्यंत ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील व्याजदर जाहीर करण्यात येतील.
जर तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सर्व योजनांचे नवे व्याजदर सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला कोणत्या योजनेत जास्त व्याज मिळत आहे याचा अंदाज येईल. पाहूया कोणत्या स्कीममध्ये किती मिळतंय व्याज.
पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीच्या अनेक योजना दिल्या जातात. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, मंथली इनकम डिपॉझिट, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अशा अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. या सर्व योजनांवर ६.७ टक्क्यांपासून ते ८.२ टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये उच्च व्याजदराव्यतिरिक्त अनेक फायदे दिले जातात.
पोस्ट ऑफिस बचत खातं (Post Office Saving Account) - बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही तुम्ही बचत खातं उघडू शकता. सध्या चालू असलेल्या दुसऱ्या तिमाहीत पोस्ट ऑफिसबचत खात्यावर ४ टक्के व्याज मिळत आहे.
पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट स्कीम (Post Office Fixed Deposit Scheme) - पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (Post Office FD Scheme) केल्यास तुम्हाला जास्त व्याज मिळतं. या योजनेत तुम्हाला ४ प्रकारे व्याज मिळतं. १ वर्षात मॅच्युअर होणाऱ्या योजनेवर ६.९ टक्के व्याज मिळत आहे. तर ५ वर्षात मॅच्युअर होणाऱ्या योजनांवर ७.५ टक्के व्याज दिलं जात आहे. त्याचप्रमाणे २ वर्षांच्या एफडीवर ७ टक्के आणि ३ वर्षांच्या एफडीवर ७.१ टक्के व्याज मिळत आहे.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम (Post Office Recurring Deposit Scheme) - पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम ही म्युच्युअल फंडांच्या एक प्रकारची एसआयपीप्रमाणेच आहे. ही स्कीम ५ वर्षात मॅच्युअर होत असली तरी तुम्ही ती ५ वर्षांसाठी वाढवू शकता. याचा अर्थ असा की यामुळे गुंतवणुकीचा कालावधी वाढवणं सुलभ होतं. सध्या या योजनेत ६.७ टक्के व्याज दिलं जात आहे. हे व्याज जुलै-सप्टेंबर २०२४ साठी लागू आहे.
सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (Post Office Senior Citizen Scheme) - पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बचत योजनाही राबविण्यात येत आहे. या योजनेवर चालू तिमाहीवर ८.२ टक्के व्याज मिळत आहे. कमीत कमी १००० रुपये गुंतवून तुम्ही या योजनेत खातं उघडू शकता. या योजनेत जास्तीत जास्त ३० लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (Post Office Monthly Saving Scheme) - पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेवर ७.४ टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत दरमहा व्याज दिलं जातं. म्हणजेच योजना मॅच्युअर होईपर्यंत व्याज दिलं जातं. मात्र, व्याजाचं उत्पन्न करपात्र आहे. या योजनेतही दर तिमाहीला व्याजामध्ये बदल केला.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (Post Office National Saving Certificate) - पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) योजनेवर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ७.७ टक्के व्याज मिळणार आहे. ही योजना पाच वर्षांत मॅच्युअर होते. या योजनेत चक्रवाढ व्याज मिळतं, म्हणजेच व्याजावर व्याज मिळतं. यात योजनेच्या मॅच्युरिटीनंतर व्याज दिलं जातं.
पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम (Post Office Public Provident Fund) - तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड देखील सुरू करू शकता. पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेवर जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी ७.१ व्याज दिलं जात आहे. पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेत व्याजाची गणना कंपाऊंडिंग पद्धतीनं केली जाते. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणताही कर आकारला जात नाही.
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र (Post Office Kisan Vikas Patra) - पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र स्कीमवही अधिक व्याज मिळत आहे. सध्या किसान विकास पत्रावर जुलै-सप्टेंबर २०२४ साठी ७.५ टक्के व्याज मिळत आहे. ही स्कीम ११५ महिन्यांत परिपक्व होते. व्याजाची गणना कंपाऊंडिंग पद्धतीनं केली जाते.
पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Post Office Mahilla Samman Saving Certificate) - पोस्ट ऑफिसमध्ये महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सुरू करण्यात आलं आहे. या योजनेत दुसऱ्या तिमाहीसाठी ७.५ टक्के व्याज दिलं जात आहे. या योजनेत ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करता येईल. ही योजना दोन वर्षांत मॅच्युअर होते.
पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजना (Post Office Sukanya Samriddhi Yojana) - पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप लोकप्रिय आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी म्हणजेच जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी या योजनेवर ८.२ टक्के व्याज दर मिळत आहे. या योजनेत टॅक्स बेनिफिट्सही मिळतात.