Post Office च्या कोणत्या स्कीम्सवर मिळतंय सर्वाधिक व्याज? जुलैमध्ये गुंतवणूकीची तयारी असेल तर चेक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 08:45 AM2024-07-01T08:45:25+5:302024-07-01T09:12:52+5:30

Post Office Investment : पोस्टाच्या अनेक योजनांमध्येही अधिक व्याज मिळतं. पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अनेक जण यामुळेच पोस्टातील गुंतवणूकीला प्राधान्य देतात.

Post Office Investment: जे लोक सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्याच्या गुंतवणुकीला प्राधान्य देतात त्यापैकी बहुतेक लोक बँकांमध्ये गुंतवणूक करतात. पण बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही गुंतवणूकीच्या अनेक योजना चालवल्या जातात. अनेक योजनांमध्ये बँकेपेक्षा चांगले व्याज दिले जाते.

पोस्ट ऑफिस लघुबचत योजनांच्या व्याजदरात सरकारकडून दर तिमाहीला सुधारणा केली जाते. मात्र, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील (जुलै ते सप्टेंबर) व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, म्हणजेच सध्याचे व्याजदर या तिमाहीतही लागू राहतील. येत्या महिन्यात पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर कोणत्या योजनेवर किती व्याज मिळेल ते आपण जाणून घेऊ.

पोस्ट ऑफिस बचत खात्यावर ४ टक्के, तर एका वर्षाच्या मुदत ठेवीवर ६.९ टक्के, २ वर्षाच्या मुदत ठेवीवर ७ आणि ३ तसंच ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर अनुक्रमे ७.१ टक्के आणि ७.५ टक्के व्याज मिळेल. ५ वर्षांच्या रिकरिंक डिपॉझिटवर ६.७ टक्के व्याज मिळेल.

पोस्टाच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ८.२ टक्के, मासिक उत्पन्न योजनेवर ७.४ टक्के, पब्लिक प्रोव्हिडंट फंडावर ७.१ टक्के, सुकन्या समृद्धी योजनेवर ८.२ टक्के. तसंच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर ७.७ टक्के, किसान विकास पत्रावर ७.५ टक्के, तसंच ७.५ टक्के व्याज देण्यात येत आहे.

यातील काही योजनांचे पर्याय तुम्हाला बँकेत मिळतील, तर काही योजनांमध्ये गुंतवणूक ही पोस्ट ऑफिसमध्येच करता येईल. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, मंथली इनकम स्कीम अशा योजना आहेत ज्यात तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन गुंतवणूक करावी लागते.

एनएससी आणि एमएसएससी या दोन्ही योजना मुदत ठेवींसारख्या आहेत. कोणताही भारतीय नागरिक एनएससीमध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टफोलियोतही या योजनेचा समावेश आहे. त्याचबरोबर महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी MSSC स्कीम चालवली जाते. या योजनेत दोन वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या योजनेत गुंतवणूक केली आहे.

त्याचबरोबर एमआयएस स्कीम ही दरमहा नियमित उत्पन्न मिळविण्याची स्कीम आहे. या योजनेत एका खात्यावर जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि जॉईंट खात्यावर जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करता येतात. ही रक्कम ५ वर्षांसाठी जमा केली जाते. यामध्ये ७.४% दरानं व्याज दिलं जातं.