रतन टाटा यांच्या बंगल्यात कोण राहणार, नोएल टाटा येणार का? १३ हजार स्क्वेअर फूटांत पसरलाय 'हलेकई'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 09:16 IST2025-04-11T08:59:07+5:302025-04-11T09:16:26+5:30
Ratan Tata Bungalow: दिवंगत रतन टाटा यांची इच्छापत्र आणि संपत्तीचं विभाजन पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आता कुलाबा येथील समुद्रकिनारी असलेल्या त्यांच्या बंगल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Ratan Tata Bungalow: दिवंगत रतन टाटा यांची इच्छापत्र आणि संपत्तीचं विभाजन पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आता कुलाबा येथील समुद्रकिनारी असलेल्या त्यांच्या बंगल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. प्रश्न असा आहे की, रतन टाटा यांचे धाकटे आणि सावत्र बंधू तसंच टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा हे या घरात राहायला येणार का? अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. नोएल टाटा आणि त्यांचे कुटुंबीय कफ परेडमधील विंडरमेरे बंगल्याऐवजी 'हेलेकई' (रतन टाटा यांचा बंगला) येथे जाण्याचा विचार करू शकतात, असं वृत्त आहे. खरं तर रतन टाटांनी आपल्या आयुष्याचे अखेरचे दिवस याच बंगल्यात घालवले होते.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा भविष्यात हलेकई येथे शिफ्ट होऊ शकतात. परंतु, काही लोकांनी ही शक्यता फेटाळून लावतात. असंही म्हटलं जात आहे की नोएल टाटा हे कफ परेडमधील विंडरमेयर मधील त्याच्या सध्याच्या घरातून हलेकाई येथे जाण्याचा विचार करू शकतात. जरी त्यांनी लगेच केलं नाही तरी ते या ठिकाणी जाऊ शकतात अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय.
हलेकई हा १३ हजार ३५० चौरस फुटांच्या भूखंडावर बांधलेला चार मजली बंगला आहे. त्याची मालकी इवार्ट इन्व्हेस्टमेंट्सची आहे. ही टाटा सन्सच्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. २०१२ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर रतन टाटा यांना हा बंगला देण्यात आला होता. ते आपल्या जर्मन शेफर्ड श्वानांसह आणि आपल्या कर्मचाऱ्यांसह येथे राहत होते. या काळात ते टाटा ट्रस्टच्या कामाकडे लक्ष देत असत.
रतन टाटा यांच्या सी फेसिंग बंगल्यात मोठा सनडेक आहे. इन्फिनिटी पूल, खाजगी लायब्ररी आणि सी-व्ह्यूसह बेडरूम आणि प्लेरूमदेखील आहेत. रतन टाटा यांच्या दिवाणखान्यात सुंदर रेलिंग असलेली भव्य जिना आहे. या घरातील आलिशान फ्लोअरिंग आणि इनडोअर प्लांट्सदेखील त्याचं सौंदर्य वाढवतात. या बंगल्याच्या बेसमेंटमध्ये १५ गाड्या पार्क करण्याची सुविधा आहे.
नोएल टाटा त्यांच्या पत्नी आलू मिस्त्री आणि त्यांचे कुटुंबीय कफ परेडमधील विंडमेरे या सहा मजली इमारतीत गेल्या काही काळापासून राहत आहेत. आलू मिस्त्री आणि त्यांच्या बहीण लैला जहांगीर यांना ही इमारत शापूरजी पालोनजी समूहाचे माजी अध्यक्ष असलेले त्यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांच्याकडून वारशाने मिळाली आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, २ एप्रिल रोजी हलकाईबद्दल नोएल टाटा यांना पाठवलेल्या ईमेलला प्रतिसाद मिळाला नाही.
पलोनजी मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समूहाचे माजी अध्यक्ष होते. पालोनजी १९८० च्या दशकापर्यंत विंडरमेरेमध्ये राहत होते. त्यानंतर ते वाळकेश्वरयेथील स्टर्लिंग बे येथे स्थायिक झाले. या इमारतीत आलू मिस्त्री यांचे सहा फ्लॅट आहेत. यातील प्रत्येक मजला सहा हजार चौरस फुटांवर पसरलेला आहे. परदेशात राहणाऱ्या लैला यांच्याकडे उर्वरित सहा फ्लॅट आहेत.
टाटा समूहाचे अन्य अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे बंगले त्यांच्या निधनानंतर कायमस्वरूपी वापरात नाहीत. जेआरडी टाटा यांचे स्कॉटिश शैलीतील दोन मजली घर 'द केर्न' अल्टामाऊंट रोडवर होते. टाटा सन्सने ते ५० कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलजवळ असलेला आणि पूर्वी नवल टाटा (नोएल आणि रतन टाटा यांचे वडील) यांच्या मालकीचा जुहू बंगलाही रिकामा आहे. काहींच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही मालमत्तांचा वापर कधी कधी टाटा समूहाचे वरिष्ठ अधिकारी किंवा कुटुंबीयांचे मित्र करतात.