एका वर्षात का तेजीने वाढले CNG-PNG चे दर, पाहा पुढे कशी असेल परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:04 PM2022-11-10T12:04:56+5:302022-11-10T12:11:50+5:30

जानेवारी महिन्यात सीएनजीचे दर 53.35 रुपये प्रति किलो होते. तर पीएनजीचे दर 35.61 रुपये होते.

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीनंतर अनेकांनी आपला मोर्चा सीएनजी गाड्यांच्या खरेदीकडे वळवला होता. परंतु कोणी विचारही केला नसेल की सीएनजी कार्स खरेदी केल्यानंतर आज ही परिस्थिती असेल. याचा अर्थ सीएनजीच्या किंमतीशी आहे. तसंच ही बाब पीएनजीच्या किंमतीलाही लागू होते.

आज सीएनजीचे दर पेट्रोल आणि डिझेलच्या जवळपास पोहोचले आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती पाहून अनेकांनी आपल्या कार्समध्ये सीएनजी किट फिट करून घेतला होता. तर अनेकांनी कंपनी फिटेड सीएनजी कार्सना पसंती दिली होती. परंतु आता त्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे.

गेल्या एका वर्षामध्ये सीएनजी पीएनजीच्या किंमतीत 70 टक्क्यांपर्यंतची वाढ दिसून आली आहे. एकेकाळी 35 रुपये किलोनं विकला जाणारा सीएनजी आज 90 रुपयांवर पोहोचला आहे. तर पीएनजीचंही दोन महिन्यांचं बिल 500-600 रुपयांदरम्यान येत होतं, ते आता 1000 रुपयांच्या वर गेलं आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या युद्धानं संपूर्ण सप्लाय चेनच बिघडवली आहे.

एकीकडे नैसर्गिक वायूचा पुरवठा कमी झाला आहे. तर दुसरीकडे भारतात आपल्या विक्रीच्या 50 टक्केच गॅसचं उत्पादन होत आहे. त्यामुळे उर्वरित 50 टक्के भाग विदेशातून मागवला जात आहे. भारतात रशियाची कंपनी गॅजप्रोम नैसर्गिक वायूचा पुरवठा करत होती. त्या कंपनीत आणि केंद्र सरकारमध्ये करारही झाला होता. परंतु युद्धानंतर तो संपुष्टात आला आणि कंपनीनं पुरवठा बंद केला.

दरम्यान, हा गॅस गॅजप्रोमसोबत असलेल्या अन्य कंपन्यांद्वारे भारतात पोहोचत आहे. परंतु त्यासाठी मोठी किंमत द्यावी लागत आहे. हा करार 15 डॉलर प्रति युनिट असा होता. परंतु अन्य कंपन्यांद्वारे तो आता 60 डॉलर्सवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये विक्रेते गॅस तिप्पट चौपट किंमतीवर विकत आहेत.

जानेवारी 2022 मध्ये सीएनजीची किंमत 53.35 रुपये किलो होती. ऑक्टोबरमध्ये त्यात वाढ होऊन ते 78.61 रुपये झाले. जानेवारी महिन्यात पीएनजीची किंमत 35.61 रुपये होती ती ऑक्टोबरमध्ये 53.59 रुपयांवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर जवळपास चार पटींनी वाढले आहेत. पीएनजीच्या वापरातही वाढ झाली आहे आणि तुलनेनं त्याचं उत्पादन कमी होत आहे.

टॅग्स :कारcar