दोनदा मृत्यूला चकमा देणारे गौतम अदानी आर्थिक संकटातून पुन्हा उभे राहणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 07:22 PM2023-02-02T19:22:15+5:302023-02-02T19:24:58+5:30

हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून जगातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गौतम अदानी यांनी याआधी दोनदा मृत्यूलाही चकमा दिला आहे. एकदा मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी, दुसऱ्यांदा त्यांना गुंडांनी ओलीस ठेवले होते. आता ते आर्थिक संकटात सापडले आहेत.

गौतम अदानींच्या जीवनाबद्दल अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. गौतम अदानी यांचा शून्यातून जगातील श्रीमंतांच्या यादीपर्यंतचा प्रवास कसा झाला हेही कळेल. आता काय आरोप आहेत आणि पुढे काय होऊ शकते? हे जाणून घेऊया.

हे प्रकरण १९९७ चे आहे. गौतम अदानी हे त्या काळात नवोदित उद्योजक होते. त्यांचा व्यवसाय देशात झपाट्याने पसरत होता. एके दिवशी गौतम अदानी यांचे अपहरण झाले. त्यांची सुटका करण्यासाठी अपहरणकर्त्यांनी सुमारे ११ कोटी रुपयांची खंडणी मागितली.

या प्रकरणी पोलिसांनी १ जानेवारी १९९८ रोजी आरोपपत्र दाखल केले. अदानीसोबत उद्योगपती शांतीलाल पटेल यांचेही अपहरण करण्यात आले होते. दोघेही कर्णावती क्लब येथून मोहम्मदपुरा रोडच्या दिशेने निघाले होते. वाटेत एका स्कूटरने त्यांची कार जबरदस्तीने थांबवली. त्यानंतर एका व्हॅनमधून गुंड उतरले आणि दोघांचे अपहरण केले.

कसेबसे त्यांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाली. आजही अदानी या विषयावर बोलू इच्छित नाहीत. त्यांना एकदा लंडनमध्ये याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. जे त्यांनी टाळले. अदानीच्या अपहरणामागे अंडरवर्ल्ड डॉन फजल उर रहमान उर्फ ​​फजलू रहमानचा हात असल्याचे बोलले जाते.

दुसरी घटना २००८ ची आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी गौतम अदानी ताज हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी तेथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. मुंबईत अनेक ठिकाणी एकाच वेळी दहशतवादी हल्ले झाले. ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात १६० लोक मरण पावले.

गौतम अदानी दुबई पोर्टचे सीईओ मोहम्मद शराफ यांच्यासोबत वेदर क्राफ्ट रेस्टॉरंटमध्ये डिनर करत होते. त्याचवेळी हॉटेलमध्ये गोळीबार सुरू झाला. कसेतरी धाडस दाखवत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आत अडकलेल्या लोकांना एक एक करून तळघरात नेले. त्यात गौतम अदानीही होते.

अदानी यांनी २६ नोव्हेंबरची संपूर्ण रात्र हॉटेलच्या चेंबरमध्ये घालवली. दुसऱ्या दिवशी, गुरुवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास सुरक्षा दलांनी त्यांना बाहेर काढले. २७ नोव्हेंबर रोजी ते त्यांच्या खासगी विमानाने अहमदाबादला रवाना झाले. मी १५ फूट अंतरावर मृत्यू पाहिलाय असं अदानींनी एका मुलाखतीत सांगितले.

अदानी जगातील टॉप-३ श्रीमंतांच्या यादीत होते आणि अजूनही टॉप-२० मध्ये आहे. त्याच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. अशा परिस्थितीत जर केंद्र सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समित्यांमध्ये त्यांना क्लीन चीट मिळाली तर अदानी समूहाची स्थिती सुधारू शकते.

देशातील सर्व आर्थिक तपास यंत्रणांच्या तपासात त्यांना क्लीन चिट मिळाल्यास त्याचा फायदा आगामी काळात होऊ शकतो. मात्र, नजीकच्या भविष्यात त्यांच्या कंपन्यांची स्थिती आणखीनच बिकट होणार आहे असं अलाहाबाद विद्यापीठाचे प्रा. प्रल्हाद यांनी सांगितले.