बजेटनंतर सोनं पुन्हा स्वस्त होणार? ज्वेलरी इंडस्ट्रीने केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:54 IST2025-01-09T16:50:52+5:302025-01-09T16:54:36+5:30
Gold Price : गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोन्यावरील सीमाशुल्क कमी केले होते. यामुळे सोने ६ हजार रुपयांनी स्वस्त झाले. यावेळीही दागिने उद्योग अर्थमंत्र्यांकडे सोन्यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी करत आहेत.

Gold Price : अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मागील अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण यांनी मोठे निर्णय घेतले होते. यात सीमाशुल्क कमी केल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती.
या वर्षीही दागिने उद्योग अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सोन्यावरील जीएसटी कमी करण्याची विनंती करत आहेत. जर सरकारने या प्रकरणी निर्णय घेतला तर यावेळीही अर्थसंकल्पानंतर सोने स्वस्त होऊ शकते.
सोन्यावरील सध्याचा जीएसटी दर ३% आहे. जर तुम्ही १०,००० रुपयांचे सोने खरेदी करत असाल तर तुम्हाला त्यावर ३०० रुपये जीएसटी भरावा लागेल. जेम्स आणि ज्वेलरी इंडस्ट्री बजेट २०२५ मध्ये सोन्यावर जीएसटीचे दर कमी करण्याची मागणी करत आहे. उद्योगाचे म्हणणे आहे की, सध्याचा ३ टक्के जीएसटी हा एक मोठा बोजा आहे, याचा स्पर्धेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे रोजगाराच्या संधीही कमी होतात.
येत्या अर्थसंकल्पात सोन्यावरील जीएसटी दर ३ टक्क्यांवरून १ टक्के करण्याची मागणी दागिने उद्योगाकडून केली जात आहे. ते म्हणतात की यामुळे उद्योग आणि ग्राहकांना खूप दिलासा मिळेल.
सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत असा उद्योगाचे मत आहे. उच्च जीएसटी हा उद्योगावर तसेच ग्राहकांवर मोठा भार आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम होत आहे.
जर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील जीएसटी कमी केला तर दागिन्यांच्या किमती कमी होतील. यामुळे सोन्याच्या विक्रीत वाढ होईल, विशेषतः ग्रामीण भागात, अशी उद्योगाला आशा आहे.
लॅबमधील हिऱ्यांसाठी सवलतीच्या दरात जीएसटी आकारण्याची मागणी उद्योगाकडून केली जात आहे. सध्या सगळ्याच हिऱ्यांवर समान जीएसटी दर लागू आहे.
गेल्या वर्षी २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी सोन्यावरील सीमाशुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्के करण्याची घोषणा केली होती. यामुळे १५ दिवसांत सोने प्रति तोळा ६००० रुपयांनी स्वस्त झाले.
त्या काळात सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली. जर यावेळीही अर्थसंकल्पात जीएसटी कपातीच्या स्वरूपात सवलत दिली गेली तर दागिन्यांच्या खरेदीत मोठी वाढ होऊ शकते, अशी आशा उद्योगाला आहे.