Wipro Bonus Share : चौदाव्यांदा बोनस शेअर देण्याच्या तयारीत 'ही' दिग्गज कंपनी, स्टॉकनं १ लाखाचे केले ४० लाख; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 11:43 AM2024-10-14T11:43:31+5:302024-10-14T11:52:13+5:30

Wipro Bonus Share : कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. या बैठकीत बोनस शेअर देण्याच्या प्रस्तावावर कंपनीचे संचालक मंडळ विचार करणार आहे.

Wipro Bonus Share : दिग्गज आयटी कंपनी विप्रोच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. सोमवारी बीएसईवर विप्रोचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून ५४५.३५ रुपयांवर पोहोचला. आयटी कंपनी पुन्हा एकदा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स भेट देण्याच्या तयारीत आहे.

विप्रोच्या संचालक मंडळाची बैठक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. या बैठकीत बोनस शेअर देण्याच्या प्रस्तावावर कंपनीचे संचालक मंडळ विचार करणार आहे. बोनस शेअर्स जारी करण्यास मान्यता मिळाल्यास कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची ही १४ वी वेळ असेल.

आयटी कंपनी विप्रोनं आतापर्यंत आपल्या भागधारकांना १३ वेळा बोनस शेअर्स भेट दिले आहेत. विप्रोने आपल्या गुंतवणूकदारांना १९७१, १९८१, १९८५, १९८७, १९८९, १९९२, १९९५, १९९७, २००४, २००५, २०१०, २०१७ आणि २०१९ मध्ये बोनस शेअर्सचं वाटप केलं आहे.

गेल्या ३ वेळा देण्यात आलेल्या बोनस शेअर्सबद्दल बोलायचं झाले तर आयटी कंपनीनं जून २०१० मध्ये ३:२ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. विप्रोनं जून २०१७ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्सचं वाटप केलं होतं. तर २०१९ मध्ये ३:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते.

आयटी कंपनी विप्रोच्या शेअर्सनं गेल्या १६ वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. १० ऑक्टोबर २००८ रोजी कंपनीचा शेअर ५९.२८ रुपयांवर होता. जर एखाद्या व्यक्तीने १० ऑक्टोबर २००८ रोजी विप्रोचे शेअर्स १ लाख रुपयांना विकत घेतले असते तर त्याला १६८६ शेअर्स मिळाले असते.

२००८ पासून विप्रोनं तीन वेळा बोनस शेअर्स गिफ्ट केले आहेत. विप्रोनं दिलेले बोनस शेअर्स जोडल्यास एकूण शेअर्सची संख्या ७४९३ वर पोहोचते. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी बीएसईवर विप्रोचा शेअर ५४५.३५ रुपयांवर व्यवहार करत होता.

सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार या शेअर्सची सध्याची किंमत ४०.८६ लाख रुपये आहे. विप्रोच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ५८० रुपयांची आहे तर शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३७५ रुपये आहे. (टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)