PF मधून पैसे काढणं झालं आणखी सोपं; बदलले काही नियम, आता क्लेम सेटलमेंट होणार अगदी झटपट

By जयदीप दाभोळकर | Updated: April 4, 2025 08:54 IST2025-04-04T08:38:27+5:302025-04-04T08:54:41+5:30

PF New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता पीएफचे पैसे काढणं आणखी सोपं झालंय. ईपीएफओच्या कोट्यवधी सभासदांना दिलासा मिळालाय.

PF New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता पीएफचे पैसे काढणं आणखी सोपं झालंय. ईपीएफओने ऑनलाइन पैसे काढण्यासाठी काही नियम बदलले आहेत. रद्द झालेल्या चेक आणि बँक खात्यासाठी आता तुम्हाला नियोक्त्याकडून (तुम्ही ज्या कंपनीत काम करता) व्हेरिफिकेशन करुन घेण्याची गरज भासणार नाही.

सुमारे आठ कोटी सदस्यांचा दावा लवकरात लवकर निकाली काढावा, हा या बदलाचा उद्देश आहे. यामुळे कर्मचारी आणि मालक दोघांचंही काम अगदी सोपं होणार आहे. कामगार मंत्रालयाने गुरुवारी एक निवेदनात जारी केलं. या पावलांमुळे दाव्याची प्रक्रिया सोपी होईल. क्लेम फेटाळण्यामुळे होणाऱ्या तक्रारीही कमी होतील, असं त्यात नमूद करण्यात आलंय.

आतापर्यंत ७.७४ कोटी सक्रिय ईपीएफ योगदानकर्त्यांपैकी ४.८३ कोटींनी आपली बँक खाती यूएएनशी जोडली आहेत. दररोज सुमारे ३६ हजार बँक खात्यांमध्ये सीडिंगसाठी विनंत्या येतात. बँकांना पडताळणीसाठी सरासरी तीन दिवस लागतात. मात्र, मालकांच्या मंजुरीसाठी आणखी १३ दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे अप्रुव्हल पेंडिंगची समस्या वाढत होती.

आता ऑनलाइन दावा दाखल करताना सभासदांना कॅन्सल्ड चेक किंवा पासबुकचा फोटो अपलोड करण्याची गरज भासणार नाही. बँक पडताळणीसाठी नियोक्त्याच्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही. म्हणजेच बँक खात्याच्या तपशीलांची पडताळणी करण्याची नियोक्त्याची मंजुरी आता पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. ज्या ईपीएफ सदस्यांना आपलं आधीचं जोडलेलं बँक खातं बदलायचं आहे ते आता आपला नवीन बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड एन्टर करून बदलू शकतात. आधार आधारित ओटीपी व्हेरिफिकेशनद्वारे त्याची पडताळणी केली जाईल.

नियमातील बदलामुळे खराब क्वालिटी किंवा वाचण्यास अवघड कागदपत्रं अपलोड केल्यामुळे होणारा विलंब दूर होईल. यापूर्वी या कारणांमुळे दावे फेटाळण्यात आले होते. लाखो सदस्यांना या बदलांचा फायदा होणार आहे. हा बदल २८ मे २०२४ रोजी काही केवायसी अपडेटेड सदस्यांसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आला. याचा फायदा १.७ कोटी ईपीएफ सदस्यांना झाला आहे. त्याचे यश पाहून ईपीएफओने आता सर्व सदस्यांना ही सवलत दिली आहे.

कामगार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार बँक खातं यूएएनशी लिंक करताना ईपीएफ सदस्यांच्या तपशीलांसह पडताळणी केली जाते. त्यामुळे या अतिरिक्त कागदपत्रांची आता गरज राहिलेली नाही. या निर्णयाचा लाभ १४.९५ लाख ईपीएफ सदस्यांना होणार आहे. त्यांच्या बँक पडताळणीसाठी मालकांची मंजुरी प्रलंबित होती, त्यामुळे आता त्यांना लवकर पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे