Success Story : १२ वर्ष दुसऱ्यांसाठी केलं काम; नंतर १ लाख गुंतवून सुरू केलं स्वत:चं काम; आज आहे ४१००० कोटींची कंपनी By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 09:04 AM 2024-08-21T09:04:50+5:30 2024-08-21T09:18:12+5:30
Success Story : तुम्ही अनेकदा या कंपनीचे प्रोडक्ट वापरले असतील. कंपनीच्या नावावरुन ही कंपनी परदेशी असल्याचं वाटतं. परंतु ही कंपनी परदेशी नाही. याची सुरुवात गोव्यापासून झाली आहे. पाहूया कसा होता या कंपनीचा आजवरचा प्रवास. आपल्याकडे मेहनत करण्याची तयारी असेल आणि मनात जिद्द असेल तर कोणतंही यश मिळवणं कठीण नाही. त्यासाठी लागते ते अपार मेहनत आणि चिकाटी. अशीच एक व्यक्ती म्हणजे ग्रेसियस साल्ढाना. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आज कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे.
१२ वर्षे ग्रेसियस साल्ढाणा यांनी इतरांसाठी काम केलं. त्यानंतर जर आपण स्वत:साठी एवढी मेहनत घेतली असती तर काय झालं असतं असा प्रश्न त्यांच्या मनात आला. साल्ढाणा यांनी केवळ १ लाख रुपयांची गुंतवणूक करून आपला व्यवसाय सुरू केला. त्या दिवशी स्थापन झालेल्या कंपनीचं बाजार भांडवल आज सुमारे ४१ हजार कोटी रुपये आहे. होय, हे अगदी खरंय, ४१,००० कोटींपेक्षा जास्त. त्यांची उत्पादनं लाखो लोकांचे प्राण वाचवत आहेत. ग्रेसियस साल्ढाणा आणि त्यांच्या कंपनीची यशोगाथा खूपच रंजक आहे.
गोव्यातील साळगाव या छोट्या पण अतिशय सुंदर गावात जन्मलेल्या ग्रेसियस साल्ढाणा यांनी आपल्या दोन मुलांच्या नावावरून आपल्या कंपनीचं नाव ठेवलं. कंपनीचं नाव पहिल्यांदा ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की ती परदेशी आहे, पण तसं नाही. साल्ढाणा यांना दोन मुलं आहे. एक म्हणजे ग्लेन आणि दुसरा म्हणजे मार्क. आत्तापर्यंत कंपनीचं नाव तुमच्या लक्षात आलंच असेल. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स असे या कंपनीचे नाव आहे.
ग्रेसियस साल्ढाणा हे विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी मिळविणारे साळगावचे पहिले पदवीधर होते. काम करत असताना गावी परतल्यावर गावातील लोकांची अवस्था आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं. तिथूनच काहीतरी करावं लागेल असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी जे केलं ते आज आपल्या सर्वांसमोर आहे.
केवळ जेनेरिक औषधे आणि एपीआय (Active pharmaceutical ingredient) तयार केले जावे असा ग्लेनमार्कचा स्पष्ट हेतू होता. एपीआय हे औषधाचे मुख्य घटक आहेत, ज्यामुळे औषध आपलं कार्य करतं. काही औषधांमध्ये एकाधिक एपीआय असतात, जे शरीरात वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. ब्रँडेड औषधांपेक्षा जेनेरिक औषधे स्वस्त आहेत. त्यामध्ये ब्रँडेड औषधांसारखेच एपीआय असतात, जरी नॉन-अॅक्क्विट घटक भिन्न असू शकतात. ते ब्रँडेड औषधांसारखे ही काम करतात. जेनेरिक आणि एपीआय मॅन्युफॅक्चरिंगबाबत सल्ढाणा यांना वेळ लागेल हे माहित होते.
हे काम सुरू होऊन दोन वर्षे झाली होती. चांगलं संशोधन आणि तयारी करून ते आपली उत्पादने बाजारात आणण्यास तयार होते. १९७९ मध्ये, ग्लेनमार्कनं त्वचेच्या रोगांच्या बाजारपेठेत प्रवेश केला आणि फंगल इन्फेक्शनसाठी कॅन्डिड क्रीम लाँच केलं. साल्ढाणा यांनी १९८५ मध्ये खोकल्याच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अॅस्कोरिल लाँच केले आणि ते सुपरहिट औषधही ठरले.
गोव्यापासून ते जागतिक बाजारापर्यंत कॅन्डिड आणि अॅस्कोरिलनं भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ तर घातलाच, पण इतर देशांमध्येही त्यांची मागणी वाढली. गोव्यातून सुरू झालेली ग्लेनमार्क १९९९ मध्ये ग्लोबल झाली. ड्रग डेव्हलपमेंटवर भर देण्याच्या उद्देशानं कंपनीनं नाशिकमधील सिन्नर येथे संशोधन व विकास केंद्र सुरू केलं. २००० सालापर्यंत ही कंपनी खूप चर्चेत होती. त्याच वर्षी कंपनीनं आपला आयपीओ शेअर बाजारात आणला. ही कंपनी १७६० कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर लिस्ट झाली होती.
कंपनीने संशोधनावर लक्ष केंद्रित केलं आणि दोन एपीआय सुविधा सुरू केल्या. ग्लेनमार्क १७६० कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर शेअर बाजारात लिस्ट झाली. चार मेगा आउट लायसन्सिंग डील्सवर स्वाक्षरी केल्यानंतर २००८ मध्ये ती ८१६० कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी बनली. ग्लेनमार्कचं परदेशातील उत्पन्न २००३ मधील २६० कोटी रुपयांवरून २०१४ मध्ये ६०१०.३७ कोटी रुपयांवर पोहोचलं. यानंतर ही एक अब्ज डॉलरची कंपनी बनली आणि त्यांची ६६ टक्के कमाई अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधून आली. ग्लेनमार्क जगातील टॉप ८० कंपन्यांच्या यादीत सामील झाली.
२०१८ पर्यंत, ग्लेनमार्कनं कँन्डिड क्रीमपासून श्वसन, त्वचा आणि कर्करोग (ऑन्कोलॉजी) क्षेत्रांचा समावेश असलेल्या ६,००० उत्पादनांपर्यंत विस्तार केला. ९,१८५.३४ कोटी रुपयांच्या महसुलासह आणि ८० देशांमध्ये कामकाजासह, ही भारतातील चौथी सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी बनली आणि दुसऱ्या क्रमांकाची वेगाने वाढणारी कंपनी बनली. मार्च २०२४ ची वार्षिक आकडेवारी पाहिली तर कंपनीला ९,०५९.१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला, त्यापैकी निव्वळ नफा ५,१६७.३ कोटी रुपये होता. जून २०२३ तिमाहीपासून भारतीय देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) कंपनीतील आपला हिस्सा सातत्यानं वाढवला आहे.
२०११ मध्ये साल्ढाणा गोव्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. २०१२ मध्ये ग्रेसियस साल्ढाना यांनी जगाचा निरोप घेतला. आता त्यांचे कुटुंबीय ही कंपनी सांभाळत आहेत. सल्ढाणा फॅमिली ट्रस्टकडे कंपनीचे ४५.४५ टक्के शेअर्स आहेत.