कामाची बातमी! बिझनेस सुरू करण्यासाठी विनातारण मिळणार २० लाखांचं लोन, कोणती आहे स्कीम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:02 IST2025-04-09T12:45:30+5:302025-04-09T13:02:01+5:30
सरकार नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी आर्थिक मदत करत आहे.

सरकार नवीन व्यवसाय तसेच आधीपासून व्यवसाय करणाऱ्यांसाठी आर्थिक मदत करते. केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना लाँच केली आहे. या योजने अंतर्गत आधी १० लाखांचे कर्ज दिले जात होते, आता यामध्ये वाढ केली आहे.
आता यो योजनेमध्ये २० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. ही योजना विशेषतः नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. या योजनेत तुम्हाला २० लाख रुपयांचे निश्चित हमी कर्ज मिळते.
आपल्याकडे नवीन व्यवसाय सुरू करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यात सर्वात महत्वाची म्हणजे आर्थिक समस्या जास्त येत असतात. यासाठी तुम्ही या योजनेतून आर्थिक मदत मिळवू शकता.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, कर्जदाराला चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कर्ज घेण्याची संधी मिळते. तुमच्या गरजेनुसार तुम्ही या चारही श्रेणींपैकी कोणताही एक निवडू शकता.
मुद्राच्या वेबसाइवर दिलेल्या माहितीनुसार, योजनेच्या ७०% लाभार्थी महिला आहेत. या योजनेअंतर्गत, सरकारने आतापर्यंत ३२९७१५.०३ कोटी रुपये वाटप केले आहेत.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात २०१५ रोजी झाली आहे. या योजनेचा उद्देश रोजगार वाढवणे आहे. यासह या योजनेच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना मदत करणे आहे. या योजनेअंतर्गत, पूर्वी सर्व अर्जदारांना १० लाख रुपयांपर्यंतचे हमी कर्ज मिळत होते. आता याची मर्यादा वाढवून २० लाख रुपये करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत, कर्जदार चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये शिशु श्रेणी, किशोर श्रेणी, तरुण श्रेणी आणि तरुणप्लस श्रेणी समाविष्ट आहेत.
शिशु श्रेणी - या श्रेणीअंतर्गत, अर्जदार ५०,००० रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात. ज्या व्यक्तींना मोठ्या कर्जाची आवश्यकता नाही. ते ही श्रेणी निवडू शकतात. तसेच किशोर श्रेणीमध्ये कर्जदारांना ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. तर तरुण श्रेणीमध्ये १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे.
तरुणपल्स श्रेणीमध्ये कर्जदारांना २० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. या योजनेतून कर्ज घेण्यासाठी तुम्ही ऑनलाई किंवा ऑफलाईन अर्ज करु शकता.
या योजनेतून लोन घेण्यासाठी आधी तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थेच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर येथून कर्ज अर्ज फॉर्म डाउनलोड करावा लागेल. यानंतर फॉर्ममध्ये विचारलेले तपशील भरा आणि सबमिट करा, त्यानंतर त्यात मिळालेला संदर्भ कोड सुरक्षितपणे ठेवा. तसेच काही दिवसांनी तुम्हाला बँक अधिकाऱ्यांचा फोन येईल. पडताळणी झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.