१० मिनिटांच्या आयडियाची कमाल; आज ३६०० कोटीचं नेटवर्थ; जाणून घ्या देशातील सर्वात तरुण अब्जाधीशाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 10:05 AM2024-08-31T10:05:58+5:302024-08-31T10:17:07+5:30

जर तुमच्यासमोर एखादं ध्येय असेल आणि ते साध्य करण्याची तळमळ असेल तर असं म्हटलं जातं की कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. मेहनत आणि जिद्द असेल तर यश हे मिळतंच.

जर तुमच्यासमोर एखादं ध्येय असेल आणि ते साध्य करण्याची तळमळ असेल तर असं म्हटलं जातं की कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. मेहनत आणि जिद्द असेल तर यश हे मिळतंच. आपलं ध्येय साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे कल्पना शक्ती, ज्यामुळे यशाचा मार्ग सोपा होतो.

यावेळी हुरुन रिच लिस्ट २०२४ मध्ये समावेश असलेल्या कैवल्य वोहरा यांनी फार कमी वयात मोठं यश मिळवलंय. आज ते ३६०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. चला तर मग जाणून घेऊया कैवल्य वोहरा यांच्या कॉलेज स्टुडंट ते इंडियाज यंगेस्ट बिलिअनेर बनण्यापर्यंतची संपूर्ण कहाणी...

पहिल्यांदाच ३०० हून अधिक भारतीय अब्जाधीशांचा हुरून श्रीमांतांच्या (Hurun India Rich List) समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पहिलं नाव येतं ते अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांचं. त्यांनी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकत सर्वात श्रीमंत व्यक्ती (India Richest Billionaire) ठरले आहेत. तर त्याचवेळी सर्वात तरुण अब्जाधीशांमध्ये क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झेप्टोचे सहसंस्थापक कैवल्य वोहरा यांचं पुन्हा एकदा नाव आलंय.

झेप्टो आपल्या व्यवसायाचा झपाट्यानं विस्तार करत असून देशातील अनेक शहरांमध्ये कार्यरत आहे, व्यवसाय वाढत असताना त्याचे बाजारमूल्यही झपाट्यानं वाढत आहे. झेप्टो एक क्विक कॉमर्स युनिकॉर्न स्टार्टअप आहे, ज्याचं मूल्य ५ अब्ज डॉलर्स इतकं आहे. केवळ १९ व्या वर्षी त्याचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा यांची IIFL Wealth-Hurun India Rich List 2022 मध्ये एन्ट्री झाली, यावर कंपनीच्या यशाचा अंदाज लावता येऊ शकतो.

सलग तिसऱ्या वर्षी सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून आता ते यादीत सामील झाले आहेत. झेप्टोचे दुसरे सहसंस्थापक, २२ वर्षीय आदित पालिचा यांचा या यादीत दुसरा सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून समावेश करण्यात आला आहे.

क्विक कॉमर्स अॅप झेप्टो २०२३ चे पहिले युनिकॉर्न बनले. झेप्टो अॅप हे भारतातील सर्वात वेगवान ऑनलाइन ग्रोसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला काही मिनिटांत ऑनलाइन ग्रोसरी, फळं, भाजीपाला, पर्सनल केअर, इलेक्ट्रॉनिक्स आणि अनेक वस्तूंची डिलिव्हरी करते. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये समावेश असलेले कंपनीचे सहसंस्थापक कैवल्य वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ३,६०० कोटी रुपयांचे मालक आहेत. आपल्या मित्रासोबत हा स्टार्टअप सुरू करण्याची कहाणी अतिशय रंजक आहे.

झेप्टोचे सहसंस्थापक कैवल्य वोहरा यांचा जन्म २००३ मध्ये बंगळुरू येथे झाला. त्यानंतर त्यांनी मुंबई आणि दुबईयेथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला. ज्या वयात अभ्यास करून चांगल्या नोकरीसाठी मेहनत करण्याचं ध्येय ठरवलं जातं, त्या वयात कैवल्या यांच्या मनात आणखी एक कल्पना आली. या कल्पनेतून त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आणि वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी २०२० मध्ये कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला. या बिझनेस प्लॅनमध्ये त्यांचा मित्र आदित पालिचा यांनी त्याला साथ दिली.

कैवल्य यांनी मित्र आदितसोबत मिळून २०१८ मध्ये शिक्षण सोडून व्यवसाय सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी कार-पूल सेवा सुरू केली. मुंबईत आल्यानंतर कैवल्य यांनी आदित यांच्यासोबत २०२० मध्ये ऑनलाइन किराणा डिलिव्हरी स्टार्टअप किराणामार्ट सुरू केलं, पण त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि मग ते बंद करावं लागलं. पण दोघांनीही हार मानली नाही आणि नव्या कल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली.

ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर सामान पोहोचवायला दोन ते तीन दिवस लागायचे आणि झटपट डिलिव्हरी स्टार्टअपच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्याचं त्यांनी ठरवले आणि येथूनच झेप्टोची सुरुवात झाली. देशात कोरोना महासाथीचा उद्रेक झाला तेव्हा लोकांना त्यांच्या घरपोच वस्तू जलद गतीने पोहोचवण्यासाठी हे स्टार्टअप सुरू करण्यात आलं होतं.

अशा तऱ्हेनं ऑनलाइन डिलिव्हरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती, ज्याचा फायदा झेप्टोला झाला. किरणमार्ट बंद झाल्यानंतर कैवल्य आणि आदित यांनी वर्ष २०२१ मध्ये या १० मिनिटांच्या कल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली आणि मग संपूर्ण खेळच बदलून टाकला.