Zomato च्या IPO ला सेबीकडून मंजुरी; बक्कळ कमाईची मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 10:41 PM2021-07-03T22:41:13+5:302021-07-03T22:45:05+5:30

Zomato IPO Investment : इश्यू होणार 'इतके' शेअर्स; जुलैच्या मध्यापर्यंत लिस्टिंगची शक्यता.

Zomato IPO : ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato च्या आयपीओला सेबीनं मंजुरी दिली आहे. कंपनीचा आयपीओ लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. तसंच जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत याच्या लिस्टिंगचीही शक्यता आहे. कंपनीचे शेअर्स BSE, NSE दोन्हीवर लिस्ट होणार आहेत.

Zomato कंपनीचा आयपीओ ८,२५० कोटी रूपयांचा असणार आहे. कंपनीनं आपल्या आयपीओसाठी यावर्षी एप्रिल महिन्यात सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सबमिट केलं होतं.

कोणत्याही कंपनीला आपला आयपीओ आणण्यापूर्वी ही कागदपत्रे सेबीकडे जमा करून त्याची मंजुरी घेणं आवश्यक असतं.

आयपीओ आणण्यासाठी Zomato नं एप्रिल महिन्यात आपल्या कंपनीला प्रायव्हेट कंपनीमधून पब्लिक कंपनीमध्ये बदलण्याचं काम केलं आहे.

यासाठी झोमॅटोनं आपल्या कंपनीचं नाव बदलून Zomato Limited वरून Zomato Private Limited असं केलं आहे.

आयपीओ आणण्यापूर्वीच Zomato नं फेब्रुवारी महिन्यात टायगर ग्लोबल, कोरा आणि अन्य कडून २५ कोटी डॉलर्सचं फंडिंग जमवलं होतं. यासाठी कंपनीची मार्केट व्हॅल्यू ५.४ अब्ज डॉलर्स इतकी ठरवण्यात आली होती.

कंपनी आपल्या आयपीओ अंतर्गत ७,५०० कोटी रूपयांचे नवे शेअर्स जारी करणार आहे. याशिवाय कंपनी आपली पेरेंट कंपनी Info Edge चे जवळपास ७५० शेअर्स ऑफर फॉर सेलसाठी ठेवणार आहे.

गेल्या एका वर्षात आलेल्या आयपीओपैकी Zomato चा आयपीओ हा सर्वात मोठ्या आयपीओंपैकी एक आहे. २०१९-२० मध्ये कंपनीचा महसूल दुपटीनं वाढून ३९.४ कोटी डॉलर्स (२,९६० कोटी रूपये) झाला आहे.

कोटक महिंद्रा लिमिटेड, मॉर्गन स्टॅनले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रेड सुइस सिक्युरिटिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी आयपीओचे ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स आणि लीड मॅनेजर्स असतील.

Zomato नं चीनच्या Ant Group मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. हा समुह जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाशी निगडीत आहे. यामध्ये जॅक मा यांची गुंतवणूक आहे.