बँकेत पीओ पदावरील नोकरी कशी मिळवाल? काय आहे पात्रता आणि पगार? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 04:29 PM 2021-08-09T16:29:57+5:30 2021-08-09T16:41:30+5:30
Bank PO Job: बँकेतील पीओ (Probationary Officer)पदावरील नोकरी खूप सुरक्षित मानली जाते. सरकारी नोकरीच्या तुलनेत बँक पीओ पदावरील नोकरीत प्रमोशन लवकर मिळतं. जाणून घेऊयात या नोकरीसाठी काय करावं लागतं? बँकेची नोकरी म्हटलं की सर्वात सुरक्षित आणि चांगला पगार अशी नोकरी संबोधली जाते. त्यामुळे दरवर्षी लाखो विद्यार्थी बँकींग परीक्षेची तयारी करत असतात. पीओ म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर पदाची नोकरी सुरक्षित मानली जाते. यासोबत चांगला पगारही मिळतो.
बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करण्याच्या विचारात असणाऱ्या तरुणाईसाठी पीओ पदावरील नोकरी हा एक उत्तम पर्याय असतो. कारण नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात या पदावर काम करुन अनुभव प्राप्त केला की पुढील तीन ते चार वर्षात प्रमोशनसाठी पात्र धरलं जातं.
शैक्षणिक योग्यता काय? बँकेच्या पीओ पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतंचं शिक्षण पूर्ण होणं गरजेचं आहे. सरकारी बँकेत पीओ पदाच्या नोकरीसाठी फक्त तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. तुम्ही किती टक्क्यांनी उत्तीर्ण झाला हे पाहिलं जात नाही.
पण खासगी बँकांमध्ये पीओ पदावर नोकरीसाठी अर्ज दाखल करताना पदवीसोबतच तुमच्या पदवी परीक्षेचा निकाल देखील पाहिला जातो. उमेदवाराला पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण असणं गरजेचं असतं.
वयोमर्यादा बँकेत पीओ पदाच्या नोकरीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं वय २० वर्षांपेक्षा कमी नसावं. तर ३० वर्षांपेक्षा अधिक वयाचा उमेदवार नसावा. यात आरक्षण प्रवर्गासाठी वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया बँकेतील पीओ पदावरील नोकरीसाठी उमेदवाराला तीन फेऱ्यांच्या परीक्षेला सामोरं जावं लागतं. यात पहिली प्रिलिम्स परीक्षा बायलिंग्वल म्हणजे हिंदी आणि इंग्रजीत घेतली जाते. त्यात उत्तीर्ण झाल्यावर उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलं जातं.
यात सामान्य ज्ञान, हिंदी, इंग्रजी, गणित संदर्भातील प्रश्न विचारले जातात. यात उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. त्यानंतर तीन फेऱ्या पूर्ण केलेल्या उमेदवाराची डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्टनंतर अंतिम निवड केली जाते.
पगार किती? बँकेच्या पीओ पदाची नोकरी जितकी सुरक्षित तितकीच चांगला पगार देणारी देखील ठरते. फ्रेशर्स उमेदवारांमध्ये बँकेतील या पदासाठी खूप मागणी असते. कारण कोणताही अनुभव नसलेल्या उमेदवारांची सुरुवात बँकेत या पदापासून होते. बँक पीओ पदावर काम करणाऱ्याला दरमहा बेसिक सॅलरी २३,७०० रुपये इतकी असते.
बेसिक सॅलरीसोबतच महागाई भत्ता, एचआरए, सीसीए आणि विशेष भत्ता देखील दिला जातो. याशिवाय मेडिकल भत्ता देखील मिळतो. त्यामुळे एकूण मिळून दरमहा पगार जवळपास ३८ हजार ७०० रुपयांपासून ते ४२ हजार रुपयांपर्यंत मिळतो.
कशी निघते वॅकेन्सी? बँक पीओ पदासाठी अनेक भरत्या निघतात. अनेक खासगी आणि सरकारी बँका वेळोवेळी बँक पीओ पदावर नोकर भरती जाहीर करत असतात. खासगी बँका पीओ पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा देखील घेतात. तर काही बँकांमध्ये परीक्षेशिवाय थेट मुलाखतीतूनही भरती केली जाते.