India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये GDS च्या ३८,९२६ पदांसाठी मोठी भरती, १० वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 08:51 AM2022-05-18T08:51:18+5:302022-05-18T09:02:38+5:30

पाहा कसा करू शकाल अर्ज.

India Post GDS Recruitment 2022, Sarkari Naukri 2022: भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

ब्रान्च पोस्टमास्तर आणि असिस्टंट ब्रान्च पोस्टमास्तरच्या एकूण ३८,९२६ पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. याबाबतची सविस्तर अधिसूचना indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवार या पदांसाठी ५ जूनपर्यंत अर्ज करू शकतात. रिक्त पदे देशाच्या विविध भागात असून त्याचा ज्तपशील वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार १० वी उत्तीर्ण असावेत आणि वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

याशिवाय उमेदवाराला सायकल चालवण्यास येणंही अनिवार्य आहे. तसंच उमेदवाराला त्यांच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.

शाखा पोस्ट मास्टरच्या पदांसाठी निवड झाल्यास उमेदवारांना १२ हजार रुपये मासिक पगारावर नियुक्त केले जाईल आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्टरच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना १० हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

या निवडीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड कम्प्युटर जनरेटेड मेरिट लिस्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया २ मे पासून सुरू करण्यात आली असून ५ मे रोजी अखेरची तारीख असणार आहे. अर्जदारांना अधिक माहिती अधिकृत नोटिफिकेशनद्वारे तपासता येईल.