Job's in Tata: केंद्राची योजना! टाटा मोटर्स १२ वी पास, आयटीआयच्या विद्यार्थ्यांना नोकरी देणार; एचआरनेच दिली माहिती... By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 02:43 PM 2022-10-20T14:43:09+5:30 2022-10-20T14:50:55+5:30
केंद्र सरकारच्या कौशल्य योजनेअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. टाटा मोटर्सने विद्यार्थ्यांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध केली आहे. जे विद्यार्थी आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी भरती सुरु केली आहे. या विद्यार्थ्यांना आयटीआय ट्रेनिंग झाल्या झाल्याच नोकरी मिळणार आहे. कंपनीने यासाठी आपली पॉलिसी बदलली आहे.
कंपनीने आपल्या फॅक्टरीमध्ये कंत्राटी कामगार ठेवण्याऐवजी आयटीआयमधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारची कौशल्य योजनेअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे.
टाटा मोोटर्सच्या एचआर डिपार्टमेंटचे अधिकारी रविंद्र कुमार यांनी ही माहिती दिली आहे. आता आम्ही सरकारच्या कौशल्य योजनेंतर्गत दुर्गम भागातील 12 वी आणि ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) पदवीधरांना नोकरीवर घेत आहोत. आम्ही त्यांना नोकरीचे प्रशिक्षण देखील देतो आणि त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्यास सक्षम बनवितो, असे त्यांनी सांगितले.
या कामगारांना अत्याधुनिक डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. टाटा मोटर्सचे भारतात सात कारखाने आहेत. यामध्ये 14,000 तात्पुरते कामगार आहेत. त्यापैकी 8,000 आयटीआय आणि बारावीचे विद्यार्थी आहेत. टाटा मोटर्समध्ये हा उपक्रम दोन वर्षांपूर्वी सुरू झाला होता.
काय आहेत योजना... केंद्र सरकारने नॅशनल अॅप्रेंटिस प्रमोशन स्कीम आणि नॅशनल अॅप्रेंटिस टेस्टिंग स्कीम अशा दोन योजना राबविल्या होत्या. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून नोकरी मिळणाऱ्या (DDU-GKY) ग्रामीण युवकांना नियमित नोकऱ्यांमध्ये किमान वेतनाच्या समान किंवा त्याहून अधिक मासिक वेतन दिले जाते. या योजनेचा लाभ अशा ५.५ कोटींहून अधिक गरीब ग्रामीण तरुणांना होईल जे कुशल बनतील. त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.