ऑनलाईन लोकमत औरंगाबाद, दि. १ : ९ ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात येणा-या मराठा क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवारी जनजागृतीच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत मराठा समाज बांधव नवचैतन्य आणि नव उत्साहाने सहभागी झाले होते. हजारो दुचाकींचा रॅलीत सहभाग असल्यामुळे सुमारे दोन कि़मी.पर्यंतच्या परिसरात दुचाकी व ‘जाणता राजा’ लिहिलेले भगवे ध्वज दिसत होते. पूर्ण शहराचे लक्ष या रॅलीने वेधून घेतले.मागील काही महिन्यांपासून मुंबईतील मोर्चाचे नियोजन करण्यासाठी समाजातील सर्व अंगीकृत संघटना व समाज बांधव ज्या मेहनतीने परिश्रम घेत आहेत, त्याचे फलित मंगळवारच्या दुचाकी रॅलीच्या रूपाने दिसून आले. ९ ऑगस्ट २०१६ पासून कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर एकवटलेल्या मराठा समाजाच्या एकतेची वज्रमूठ कायम असून, विविध मागण्यांसाठी संयम, शांती आणि शिस्तीने समाज लढा देत आहे. मागच्या वर्षी ठिकठिकाणी निघालेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाची ऐतिहासिक नोंद झाली, तर यावर्षीदेखील मुंबईचा मोर्चा ऐतिहासिक व दखलनीय ठरावा यासाठी पूर्ण तयारीनिशी समाज कार्यरत आहे. शिवछत्रपती महाविद्यालय येथून शिस्तीमध्ये निघालेली ही रॅली जयभवानीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे सरकली. त्यानंतर पुंडलिकनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. गजानन महाराज मंदिर मार्गे त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी जालना रोडवरून मोंढा उड्डाणपुलावर ही रॅली क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पुढे सरकली. क्रांतीचौकात जोरदार घोषणा देत शिस्तीने पैठणगेट मार्गे सिटीचौक ते लेबर कॉलनीपर्यंत रॅली आली. तेथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून टी.व्ही.सेंटर हडकोपर्यंत रॅली आली. तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर बजरंग चौक ते चिश्तिया चौकातून कॅनॉट गार्डनमध्ये रॅलीचा समारोप झाला. राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाल्यानंतर ‘भारत माता की जय’ या जोशपूर्ण घोषणेने परिसर दणाणून गेला. ९ आॅगस्ट रोजी मुंबईत निघणाºया क्रांती मोर्चामध्ये या चैतन्याने सहभागी होण्याचा निर्धार करीत रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व समाज बांधव शिस्तीने कॅनॉट गार्डन परिसरातून बाहेर पडले. घोषणाबाजीचा आवाजशिवछत्रपती महाविद्यालय ते कॅनॉट गार्डनपर्यंतच्या या पूर्ण १२ ते १५ कि़मी.च्या वर्तुळात रॅलीचा मार्ग होता. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये हजारो दुचाकी वाहनांनी शहराचे वातावरण बदलून टाकले. उत्साह, नवचैतन्यासह निघालेल्या या रॅलीमध्ये ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय, ‘आरक्षण आहे आमच्या हक्काचे’, या व अशा अनेक घोषणांनी रॅली मार्ग दुमदुमून गेला होता. महिला, तरुण, तरुणी, युवक, आबालवृद्धांसह सर्व राजकीय पक्षांतील पदाधिकारी, संघटना सदस्यांनी रॅलीचे संचलन केले. कुठेही बेशिस्तपणा नाहीरॅलीमध्ये कुठेही बेशिस्तपणा नव्हता. स्वयंसेवकांनी पोलिसांना मदत केली. वाहतूक खोळंबू नये यासाठी २०० मीटरवर रॅली येण्यापूर्वीच स्वयंसेवक पुढील चौकात रॅली येत असल्याचे सूचित करीत होते. त्यामुळे इतर वाहतूक आहे तेथेचे थांबायची. काही मिनिटांत रॅली पुढे निघाली की, वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही ठिकाणी स्वयंसेवकांनी पोलिसांना मदत केली. विशेषत: गजानन महाराज मंदिर, आकाशवाणी, अमरप्रीत, क्रांतीचौक, लेबर कॉलनी, टी.व्ही. सेंटर येथील सिग्नलवरून रॅली लवकर पुढे घेण्यात आली. त्यामुळे शहरात कुठेही वाहतूक खोळंबली नाही. महिलांचा उत्स्फूर्त सहभागदुचाकी रॅलीमध्ये महिला, महाविद्यालयीन तरुणी, युवतींचा मोठा सहभाग होता. ट्रॅक्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. रॅली शिस्तीने पुढे जावी यासाठी ट्रॅक्टरच्या पुढे स्वयंसेवकांचे आवाहन करणारे वाहन होते. ट्रॅक्टरमागे महिलांच्या दुचाकी होत्या. महिलांनी रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवीत, जोरदार घोषणाही दिल्या. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनातील ऊर्जा कायम असल्याचे दिसून आले. प्रत्येक जण रॅलीमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाला होता. सोशल मीडियातून संदेशसोशल मीडियातून या रॅलीसाठी संदेश देण्यात आला होता. सकाळी ७ वाजेपासून शिवछत्रपती महाविद्यालय परिसरात समाजबांधवांनी दुचाकी, शिवध्वजासह हजेरी लावण्यास सुरुवात केली. ११ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून रॅलीला सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत शहरातील १५ कि़मी. अंतर पार करून रॅलीचा कॅनॉट गार्डनमध्ये समारोप झाला. आता तयारी मोर्चाची९ ऑगस्ट रोजी मुंबईतील मोर्चात सामील होण्यासाठी कॉर्नर बैठका, सोशल मीडियातून एसएमएस पाठविण्याचे नियोजन सुरू आहे. जिल्ह्यात स्थानिक समितीमार्फत मोर्चाच्या नियोजनासाठी वारंवार सूचना, संदेश देण्यात येत आहेत, असे मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजन समितीतर्फे सांगण्यात आले.