Delhi Woman Draging Case Video: चाकात अडकलेली तरुणी, युटर्न घेणारी कार...; फरफटत नेतानाचे हॉरर सीसीटीव्ही फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 12:20 PM2023-01-02T12:20:25+5:302023-01-02T12:28:04+5:30

नववर्षाच्या पहाटे एका तरुणीला कारने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

देशाची राजधानी दिल्लीची आज पुन्हा एकदा मान शरमेने खाली झुकली. नववर्षाच्या पहाटे एका तरुणीला कारने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी बलेनो कारच्या पहिल्या चाकात अडकलेली दिसत आहे. कार चालक तिला तसेच रस्त्यावरून फरफटत नेताना दिसत आहे. या व्हिडीओ नंतर पोलिसांकडून एफआयआरमध्ये सदोष मनुष्यवधाचे कलम जोडण्यात आले आहे.

कंझावाला भागातील हे सीसीटीव्ही फुटेज पहाटे साडेतीन वाजताचे आहे. लाडपूर गावाच्या थोडं पुढे ही कार युटर्न घेताना दिसत आहे. पुन्हा ही कार तोसी गावाकडे वळली होती. यावेळी पहिल्या चाकामध्ये तरुणीचा मृतदेह दिसत आहे.

कारने पुढे गेल्यावर यू-टर्न घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी दीपकने सांगितले होते. गाडी नॉर्मल स्पीडमध्ये होती आणि ड्रायव्हर नॉर्मल असल्याचं दिसत होता, असे तो म्हणाला होता. पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास दीपक दूध वितरणाची वाट पाहत असताना त्यांना एक कार येताना दिसली. त्या गाडीच्या मागच्या चाकांमधून मोठा आवाज येत होता.

दिल्ली आऊटरचे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल. त्यांनी दारू प्यायली होती की नाही याची पुष्टी करण्यासाठी आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. पोस्टमार्टम बोर्ड तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे. तीन डॉक्टरांचे पथक शवविच्छेदन करणार आहे.

अटक करण्यात आलेल्या पाच तरुणांनी सांगितले की तरुणी गाडीखाली अडकली होती, त्यामुळे ती आम्हाला दिसली नाही. पोलिसांना तरुणीला 4-5 किलोमीटरपर्यंत फरफटत नेण्यात आल्याचे दिसत आहे. परंतु दिल्ली पोलिस पुन्हा गुन्ह्याच्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत. आरोपींना जामीन मिळू नये म्हणून दिल्ली पोलीस आपल्या कायदेशीर टीमच्या संपर्कात आहेत.

पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनने अपघातग्रस्त स्कूटी पाहिली होती. परंतू तरुणी तिथे सापडली नव्हती. दुसरीकडे पीसीआर व्हॅनमध्ये उपस्थित असलेले पोलिस शुद्धीत नव्हते आणि त्यांनी दीपकची तक्रार जाणून घेण्यात रस घेतला नाही, असा आरोप दीपकने केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, एक करड्या रंगाची कार कुतुबगडच्या दिशेने जात असल्याची माहिती कोणीतरी कॉलवर दिली होती. त्या कारला एक मृतदेह लटकलेला दिसत असल्याचे त्याने म्हटले होते. यानंतर लगेचच बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. पोलिसांनी गाडीचा शोध सुरू केला होता. काही वेळाने पोलिसांना पीसीआरचा दुसरा कॉल आला. कांजवाला पोलीस ठाण्यात एका मुलीचा मृतदेह रस्त्यावर पडून असल्याचे फोनवरून सांगण्यात आले.