Shraddha Walker Murder Case :"आफताबला होतं ड्रग्जचं व्यसन, श्रद्धाने मागितलेली मदत"; 'या' अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 01:56 PM2022-11-22T13:56:43+5:302022-11-22T14:13:49+5:30

Shraddha Walker Murder Case : टीव्ही अभिनेता इमरान नाजिर खान याने या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. श्रद्धा वालकर ही इमरानची मैत्रीण होती.

श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. आफताब अमीन पूनावाला याने गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरची हत्या केल्याचा गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला. आफताब आणि श्रद्धा हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. याच वर्षी दोघं दिल्लीला राहायला गेले होते. महरौली परिसरात त्यांनी फ्लॅट घेतला होता.

श्रद्धा आणि आफताब या दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. 18 मे रोजी जेव्हा लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये भांडण झालं, तेव्हा आफताबने श्रद्धाची हत्याच केली. हत्येनंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे गेले आणि ते जंगलात विविध ठिकाणी फेकून दिले. याचप्रकरणी आता नवीन अपडेट समोर आली आहे.

टीव्ही अभिनेता इमरान नाजिर खान याने या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. श्रद्धा वालकर ही इमरानची मैत्रीण होती. श्रद्धाने आफताबच्या व्यसनाविषयी सांगितल्याचा दावा इमरानने आता केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

"आफताबला ड्रग्जचं व्यसन आहे आणि हे व्यसन मला सोडवायचं आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो ड्रग्जचं व्यसन करतोय" असं श्रद्धाने आपल्याला सांगितल्याचं इमरानने म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून इमरान काश्मीरमध्ये होता. सोमवारी जेव्हा तो मुंबईत परतला तेव्हा श्रद्धा वालकरच्या मृत्यूची बातमी वाचून त्याला धक्काच बसला.

एका मुलाखतीत इमरान म्हणाला, "मी श्रद्धाला ओळखतो. फेब्रुवारी 2021 मध्ये तिने मला सांगितलं होतं की तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तिचा बॉयफ्रेंड ड्रग ॲडिक्ट आहे आणि गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो ड्रग्ज घेतोय. आफताबचं व्यसन सोडवण्यासाठी तिने माझ्याकडून रिहॅब सेंटरची माहिती घेतली होती."

श्रद्धाला रिहॅब सेंटरची फारशी माहिती नसल्याने तिने इमरानकडे मदत मागितली होती. इमरानने अनेक तरुणांना ड्रग्जच्या व्यसनातून बाहेर पडण्यास मदत केली आहे. इमरानने श्रद्धालाही मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र दिल्लीला गेल्यानंतर तिने कधीच संपर्क साधला नसल्याचं, इमरानने म्हटलं केलं.

इमरानने आजवर अनेक लोकप्रिय शोजमध्ये काम केलं आहे. गठबंधन, अलादीन: नाम तो सुना होगा, मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह, हमारी बहू सिल्क, मॅडम सर यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. इमरान हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसुद्धा आहे. त्याने तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आफताबच्या एका मित्राने आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे. निशंक मोदी असं या मित्राचं नाव असून त्याने आजतकसोबत संवाद साधताना विविध खुलासे केले आहेत. आफताब एखाद्य़ा व्यक्तीची हत्या करेल याचा कधी विचारच केला नव्हता. त्यामुळे यावर विश्वास बसत नसल्याचं निशंकने सांगितलं.

"मी आफताबला 15 वर्षांपासून ओळखतो. शाळा सुटल्यानंतर आम्ही एकत्र खेळायचो. त्याचा स्वभाव चांगला होता. त्याला खूप राग आलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं" असंही म्हटलं आहे. आफताब 2019 पासून विविध ठिकाणी वास्तव्यास असायचा. यानंतर आफताबचं कुटुंबदेखील दुसरीकडे राहायला गेलं, असं निशंक म्हणाला.

आफताब आणि श्रद्धाच्या नात्याबद्दल मी ऐकलं होतं. ती आफताबच्या घरी जायची, हे मी ऐकून होतो. मात्र तिला कधीच पाहिलं नव्हतं. आफताब असा काही गुन्हा करेल याची कल्पनादेखील त्याला ओळखणाऱ्या कोणी केली नसेल, असंही निशंक मोदी याने म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांना या प्रकरणात महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी त्याने आपल्या वसई येथील घरातून 37 बॉक्स हे दिल्लीला पाठवले होते. या 37 बॉक्समध्ये नेमकं काय सामान होतं याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून त्याने बॉक्स दिल्लीला पाठवले होते. तसेच त्यासाठी पैसेही दिले होते.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने दिल्ली पोलिसांना सांगितले होते की, दिल्लीला जाण्यापूर्वी वसईतील घरातून सामान नेण्यासाठी पैसे कोण देणार यावरून त्याचे आणि श्रद्धाचे भांडण झाले. गुडलक पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीच्या माध्यमातून आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी मुंबईहून दिल्लीला सामान हलवले होते. 37 बॉक्समधून हे सामान दिल्लीला आणण्यात आलं.