Arnab Goswami : अबू सालेमवर जेथे हल्ला झाला, तेथे तळोजा कारागृहात अर्णब यांना केलीय कैद By पूनम अपराज | Published: November 9, 2020 02:39 PM 2020-11-09T14:39:56+5:30 2020-11-09T16:20:07+5:30
Arnab Goswami : वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या आईला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पत्रकार अर्णब गोस्वामी यांना तळोजा जेलमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यांना आधी अलिबागच्या उप कारागृहात ठेवण्यात आलं होतं. चार तारखेला त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते अलिबागलाच एका शाळेत तयार केलेल्या उपकारागृहात क्वारंटाईन होते. मात्र, पोलिसांनी अचानक अर्णब यांना नवी मुंबईतल्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात हलवलंय. त्याला कारणही तसंच आहे. अर्णब गोस्वामी यांनी अलिबागच्या कारागृहात मोबाईल फोनचा वापर केला होता आणि ते समाजमाध्यमांवर सक्रीय होते असं कारागृहाच्या प्रशासनाच्या लक्षात आलं.
न्यायालयीन कोठडीत असताना आरोपीला मोबाईल किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगायला कायद्याने मनाई आहे. असं असूनही त्यांनी तुरूंगात कोणाचा तरी मोबाईल घेतला आणि समाजमाध्यमांवर सक्रीय असल्याचं दिसून आलं. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सगळे मोबाईल काढून घेण्यात आले होते. मग हा मोबाईल त्यांच्याकडे कसा आला आणि कोणी दिला याचा आता तपास सुरू आहे.
तसेच तळोजा जेलमध्ये जेथे अर्णब यांना कैद केली आहे, तेथे कुख्यात गुंड अबू सालेमवर हल्ला झाला होता. कुख्यात गुंडांना ठेवलं जाणाऱ्या तळोजा जेलबाबत अधिक माहिती जाणून घेऊया
मुंबईपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या नवी मुंबईनजीक असलेल्या तळोजा येथे तळोजा जेल आहे.
या जेलला अंडरवर्ल्ड डॉनचे दुसरे ठिकाण असल्याचे देखील म्हटले गेले होते. या जेलमध्ये एकापेक्षा एक कुख्यात गुंड कैद आहेत.
महाराष्ट्राच्या या सर्वात मोठ्या कारागृहात मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटातील आणि २६/११ मुंबईवर झालेल्या भीषण हल्ल्यातील काही आरोपी कैद आहेत.
गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी आणि डी कंपनीचा सदस्य कुख्यात गुंड अबू सालेम आणि अब्दुल कय्युम यांना याच जेलमध्ये ठेवले होते.
याच जेलमध्ये अबू सालेम याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, तर २०१२ साली वकील शाहिद आझमी यांच्या हत्येप्रकरणी आरोपी देवेंद्र जगताप देखील या जेलमध्ये होता.
भरत नेपाली गँगचा गुंड अब्बास खान आणि मटका किंग सुरेश भगत हत्येतील आरोपी याच कारागृहात खडी फोडत आहेत.