Aryan Khan Drugs Case: पंच पलटल्याने एनसीबीची केस कमजोर? आर्यन खान प्रकरणात काय म्हणताहेत जाणकार... By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 11:45 AM 2021-10-25T11:45:42+5:30 2021-10-25T11:56:00+5:30
Aryan Khan Mumbai cruise Rave party: आर्यन खानला कार्डिला क्रूझवर ड्रग्ज पार्टीवेळी ताब्यात घेण्यात आले. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाही. तो क्रूझवर देखील पोहोचला नव्हता तेवढ्यात एनसीबीने त्याला ताब्यात घेतले असा दावा त्याचे वकील करत आहेत. त्यातच पंचानेही काल मोठा खुलासा केला आहे. कोणत्याही केसमध्ये छापा मारताना किंवा रिकव्हरी करताना कमीत कमी दोन पंच आसावेत, असे कायद्यात म्हटले आहे. मात्र, जेव्हा एखादा पंचच त्या एजन्सीविरोधात गंभीर आरोप करत असेल तर त्या प्रकरणात नवीनच पेच निर्माण होतो.
शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीतही असेच झाले आहे. आर्यन खानला कार्डिला क्रूझवर ड्रग्ज पार्टीवेळी ताब्यात घेण्यात आले. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाही. तो क्रूझवर देखील पोहोचला नव्हता तेवढ्यात एनसीबीने त्याला ताब्यात घेतले असा दावा त्याचे वकील करत आहेत.
असे असताना एनसीबीच्या पंचाने रविवारी मोठा खळबळजनक दावा करून पारडेच पालटले आहे. प्रभाकर नावाच्या पंचाने कोर्टात अॅफिडेविट करून ज्या पंचनाम्यावर त्याची सही असल्याचे एनसीबी सांगत आहे, त्यावर त्याने 2 ऑक्टोबरला ना क्रूझवर सही केली, ना ही बाहेर कुठे सही केल्याचे म्हटले आहे.
एनसीबी मुख्यालयामध्ये त्याच्याकडून दहा ब्लँक पेपरवर सह्या करून घेण्यात आल्या. तसेच या केसमध्ये 25 कोटींची डील झाल्याचा आरोप त्याने केला आहे. यापैकी ८ कोटी रुपये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्याबाबत फोनवर बोलताना त्याने ऐकल्याचा दावा केला आहे.
समीर वानखेडेंवर पैसे उकळण्याचा आरोप लावला आहे. यामुळे महाराष्ट्र पोलीस समीर वानखेडेंविरोधात एफआयआर दाखल करू शकतात का, असा सवाल उपस्थित होत आहे. यावर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी एनबीटीला सांगितले की, अॅफिडेव्हिट दाखल झाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. यामुळे आता न्यायालयच समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल करायचा की नाही हे ठरवेल.
माजी आयपीएस अधिकारी आणि वकील वायपी सिंह यांचे मत महालेंपेक्षा वेगळे आहे. एनसीबी केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने केंद्र सरकार याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून करून घेईल. सीबीआय याचा तपास करेल.
परंतू सीबीआयला या प्रकरणाचा तपास करणे तेवढे सोपे नाही. कारण बोगस टीआरपी प्रकरणी महाराष्ट्र सरकारने सीबीआयला थेट कारवाई करण्यापासून रोखले होते. यापुढे सीबीआयला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. जी राज्य सरकार देणे कठीण आहे.
महाले म्हणतात की, जर मी आर्यन खानचा वकील असतो तर प्रभाकर सैलने जारी केलेला व्हिडिओतील सह्यांची गोष्ट केलीय ती कट करून तपास अधिकाऱ्याला दाखवून थेट विचारले असते. जेव्हा तुमचाच पंच हे बोलतोय, मग 2 ऑक्टोबरला क्रूझवरून ड्रग्ज जप्त केल्याची गोष्ट कशी योग्य आहे?
एनसीबीने काय चूक केली.... महाले आणि सिंह यांच्या म्हणण्यानुसार एवढी हायप्रोफाईल केस होती, मग खासगी पंचांऐवजी सरकारी कर्मचाऱ्यांना पंच बनवायला हवे होते. खासगी पंच आताच पलटला आहे आणि त्याचा व्हिडीओ सार्वजनिक झाला आहे.
या पंचाने कोर्टातही धाव घेतली आहे. यामुळे एनसीबीसाठी आर्यन खान प्रकरण आणि खटला नक्कीच सोपा राहिलेला नाही, असे या दोघांचे म्हणणे आहे. आता आर्यन खानच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावरही या आरोपांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.