Baba Siddiqui : कोणी दिली होती बाबा सिद्दिकी यांना मारण्याची ऑर्डर?; आरोपी शिवकुमारने थेट नावच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 05:49 PM2024-11-11T17:49:26+5:302024-11-11T18:15:23+5:30

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. आता मुख्य शूटर शिवकुमार गौतमच्या अटकेनंतर नवी माहिती समोर येत आहे.

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. याप्रकरणी अनेकांना विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे. आता मुख्य शूटर शिवकुमार गौतमच्या अटकेनंतर नवी माहिती समोर येत आहे.

शिवकुमार गौतमने सांगितलं की, तो लॉरेन्स बिश्नोईला कधीही भेटला नाही. लॉरेन्सचा छोटा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी स्नॅपचॅटद्वारे बोललो होतो आणि त्यानेच बाबा सिद्दिकी यांना मारण्याचे आदेश दिले होते.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमार गौतमच्या अटकेवर, यूपी एसटीएफ प्रमुख अमिताभ यश म्हणाले की, शिवकुमार गौतम आणि त्याच्या साथीदारांना यूपी एसटीएफ आणि मुंबई गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईनंतर अटक करण्यात आली.

शिवाने सांगितलं की, तो स्नॅपचॅटवर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाशी बोलला होता. लॉरेन्स गँग अशा प्रकारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुन्हेगारांशी संपर्क साधते आणि काम झाल्यानंतर त्यांना सोडून देते.

मुंबईतील बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील फरार शिवकुमार गौतम उर्फ ​​शिवा याला यूपी एसटीएफ आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने बहराइच जिल्ह्यातील नेपाळकडे जाणाऱ्या रस्त्यावरून अटक केली.

शिवा गौतमसह त्याच्या आणखी चार साथीदारांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वीच त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे, एक धर्मराज कश्यप आणि दुसरा शूटर हरियाणाचा आहे. मात्र गोळीबारानंतर शिवा फरार झाला होता.

शिवा गौतमने बाबा सिद्दिकी यांना गोळ्या घालून मुंबईहून पुणे गाठलं आणि नंतर गावातील मित्रांसोबत लपून बसले. आज तो आपल्या मित्रांसोबत नेपाळला जाण्याच्या बेतात असताना यूपीच्या एसटीएफ टीमने नेपाळच्या वाटेवर नानपारा कोतवाली परिसरातून त्याला अटक केली.

शिवकुमारचे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या संपूर्ण डेटा मागवण्यात आला, ज्यामध्ये एकूण ४५ लोकांचा समावेश होता. या ४५ लोकांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात होती.

हे लोक कुठे जातात, कोणाला भेटतात अशी त्यांची प्रत्येक हालचाल ट्रॅक केली होता. प्रकरणाचा तपास जसजसा पुढे गेला आणि लोकांना ट्रॅक केलं गेलं, तसतसा तपास ४ जणांवर येऊन थांबला, जे शिवकुमारच्या सतत संपर्कात होते.

अटक करण्यात आलेल्या चार आरोपींवर पोलीस काही दिवसांपासून बारीक लक्ष ठेवून होते, त्यांचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं होतं. त्यानंतर गुन्हे शाखेला पुष्टी मिळाली की, हे चार लोक शिवकुमार गौतमला भेटतात आणि त्याच्या सतत संपर्कात आहेत.

गुन्हे शाखेने सापळा रचून शिवकुमारला भेटण्यासाठी या चार जणांची १० तारखेपर्यंत वाट पाहिली. शिवकुमारने ज्या ठिकाणी सेफ हाऊस बांधले होते, त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता. शिवकुमार तेथे पोहोचताच गुन्हे शाखा आणि यूपी एसटीएफने त्याला आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे.