एकुलत्या एका मुलाचा खुलासा : एका रूममध्ये तीन हत्या, आधी बहीण मग आई-आजी-बाबांची हत्या....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 02:24 PM2021-09-03T14:24:44+5:302021-09-03T14:31:47+5:30

सर्वांवर गोळ्या झाडल्यानंतर अभिषेकने घराचे दार बंद केले आणि मित्राच्या घरी गेला. साधारण दोन वाजता तो घरी परत आला. त्यानंतर त्याने मामाला फोन केला.

हरयाणाच्या रोहतक विजय नगर हत्याकांडाची चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे हैराण करणारे खुलासे होते आहे. गुरूवारी सकाळी ६ वाजता डीएसपी सज्जन सिंह आणि डीएसपी गोरखपाल राणा यांच्या नेतृत्वात पोलीस आरोपीला घेऊन घटनास्थळी पोहोचले. इथे आरोपीने पोलिसांसमोर ४५ मिनिटे क्राइम सीन सांगितला. पोलिसांनुसार अभिषेकने सांगितलं की, पैसे न मिळाल्याने तो परिवारावर नाराज होता. त्याने गेल्या शुक्रवारी दुपारी साधारण १ वाजता घरात ठेवलेली ३२ बोर रिव्हॉल्वर घेतली आणि वरच्या रूममध्ये गेला. तिथे त्याची बहीण नेहा(१९) झोपलेली होती. त्याने तिच्या डोक्यावर गोळी झाडली. आरोपीने सांगितलं की, बहिणीवर गोळी झाडल्यावर त्याने आवाज देऊन आजी रोशनीला काही कामानिमित्त वर बोलवलं. त्यादरम्यान त्याने नेहाचा मृतदेह कपड्यांनी झाकला. जेणेकरून आजीला वाटावं नेहा झोपली आहे.

आजी आत येताच त्याने तिच्यावर डोक्यावर गोळी झाडली आजी जागेवरच कोसळली. त्यानंतर त्याने आणखी एक गोळीवर आजीवर झाडली. त्यानंतर त्याने आईला रूममध्ये येण्यासाठी आवाज दिला. सोबतच म्हणाला की, आजी तुला बोलवत आहे. यावेळी त्याने दरवाजा अर्धा उघडा ठेवला होता. जशी त्याची आई रूममध्ये आली काही कळायच्या आत त्याने तिच्या डोक्यावरही गोळी झाडली. आई सुद्धा तिथेच कोसळली. वर बहीण, आजी आणि आईची हत्या करून अभिषेक वेगाने खाली आला. तेव्हा आतील रूममध्ये त्याचे वडील बबलू पेहलवान फोनवर बोलत होते. त्याने त्यांच्याही डोक्यावर गोळी झाडली. तेही जागेवर ठार झाले. त्यानंतर ते जिवंत राहू नये म्हणून त्याने त्यांच्या डोक्यात आणखी दोन गोळ्या झाडल्या.

सर्वांवर गोळ्या झाडल्यानंतर अभिषेकने घराचे दार बंद केले आणि मित्राच्या घरी गेला. साधारण दोन वाजता तो घरी परत आला. त्यानंतर त्याने मामाला फोन केला. त्यानंतर मामाला सगळं सांगत आरडाओरड करू लागला. त्यानंतर आजूबाजूचे लोक आले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी नेहाचा श्वास सुरू होता. तिला एका तरूणाने हॉस्पिटलमध्ये नेलं. बबलू, बबली आणि रोशनीचा मृत्यू झाला होता. नंतर नेहाचाही मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितलं की, अभिषेकचा मित्र नैनीतालचा कार्तिक याच्या चौकशीची तयारी सुरू केली आहे. अडीच वर्षापूर्वी कार्तिक आणि अभिषेक दिल्ली क्रू-मेंबरचा कोर्स करत होते. तिथेच दोघांची मैत्री झाली होती. त्यासोबतच पोलीस त्याच्या आणखी दोन मित्रांचा शोध घेत आहेत.

चौकशी दरम्यान आरोपीने सांगितलं की, त्याला ३२ बोरची रिव्हॉल्वर घरातच सापडली. आता पोलीस शोध घेत आहे की, पिस्तुलचं लायसन्स होतं की नाही. अभिषेकचे वडील बबलू पेहलवान यांच्याकडे लायसन्स डोगा बंदूक होती. जी त्यांनी जमा केली होती. त्यानंतर त्यांनी लायसन्सवर रिव्हॉल्वर काढलं होतं की, नाही हे स्पष्ट होऊ शकलं नाही.

सोनीपत जिल्ह्यातील मदीना गावातील बबलू पेहलवान २० वर्षापासून रोहतकच्या विजय नगरमध्ये राहत होते. ते व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर होते. २७ ऑगस्टला घरात बबलू, त्यांची पत्नी बबली आणि सासू रोशनीचे मृतदेह आढळून आले होते. तर मुलगी नेहाचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला. चारही जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. बुधवारी सहा दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपात प्रॉपर्टी डीलरचा २० वर्षीय मुलगा अभिषेक याला अटक केली.