महिलांना विष देऊन लुटणारा खतरनाक गुन्हेगार, जाणून घ्या चार्ल्स शोभराज कसा बनला 'बिकिनी किलर'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 02:14 PM2022-12-22T14:14:16+5:302022-12-22T14:23:51+5:30

Charles Sobhraj: चार्ल्स शोभराजचे वडील भारतीय होते आणि आई व्हिएतनामची होती. 1975 मध्ये चार्ल्स फेक पासपोर्टच्या माध्यमातून नेपाळमध्ये आला होता.

Charles Sobhraj: नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय घेत फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजला तुरूंगातून सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याला वयाच्या आधारावर मुक्त केलं जात आहे. दोन अमेरिकन टुरिस्टच्या हत्येच्या आरोपात 2003 पासून नेपाळच्या तुरूंगात कैद होता. इतकंच नाही तर कोर्टाने त्याला सोडल्यावर 15 दिवसांच्या आत डिपोर्ट करण्याचा आदेशही दिला आहे.

चार्ल्स शोभराजचे वडील भारतीय होते आणि आई व्हिएतनामची होती. 1975 मध्ये चार्ल्स फेक पासपोर्टच्या माध्यमातून नेपाळमध्ये आला होता. त्याच्यावर अमेरिकन नागरिक कोनी जो बोरोनजिक आणि तिची मैत्रीण कॅनडाची लौरेंट केरियरच्या हत्येचा आरोप होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार्ल्स शोभराजचं खरं नाव हतचंद भाओनानी गुरुमुख चार्ल्स शोभराज असं आहे. त्याला गुन्हेविश्वात बिकिनी किलर म्हणून ओळखलं जातं. 1970 मध्ये चार्ल्सने साधारण 20 लोकांची हत्या केली होती. यात जास्तीत जास्त फॉरेन टुरिस्ट महिला होत्या.

असं सांगण्यात येतं की, तो भारतात फिरायला येणाऱ्या परदेशी महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून नशेचे पदार्थ देत होता. नंतर त्यांच्यासोबत संबंध ठेवून त्यांची हत्या करत होता.

चार्ल्सने 1976 मध्ये भारतात फिरायला आलेल्या एका फ्रेंच ग्रुपची हत्या केली होती. त्याच्यावर इस्त्राईलच्या टुरिस्टच्या हत्येचाही आरोप होता. याबाबत त्याला 7 वर्षांची शिक्षा मिळाली होती. 1986 मध्ये तो त्याच्या साथीदारांसोबत तिहार तुरूंगातून पळून गेला होता. त्यानंतर तो पुन्हा पकडला गेला आणि नंतर शिक्षा पूर्ण केल्यावर तो फ्रान्सला गेला होता. अमेरिकन टुरिस्टच्या हत्येसाठी त्याला नेपाळमध्ये अटक केली गेली. इथे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

गुन्हेविश्वात चार्ल्स शोभराजला 'द सर्पेंट' आणि 'बिकिनी किलर' सारख्या नावांनी ओळखलं जातं. असं सांगितलं जातं की, चार्ल्सला अनेक भाषा येत होत्या. त्याचं व्यक्तित्व खूप चांगलं होतं. यामुळेच खासकरून परदेशी महिला त्याला खूप पसंत करत होत्या. चार्ल्सने त्याच्या थायलॅंडमध्ये राहणारी गर्लफ्रेंड मॅरी एंड्रीसोबत मिळून अनेक गुन्हे केले.

चार्ल्स शोभराज एक कॉनमॅनही होता. महिलांना फसवून तो आधी त्यांना विष देत असे आणि त्यांच्या महागड्या वस्तू घेऊन फरार होत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार्ल्स त्याच्या वडिलांचा खूप राग करत होता. त्यांना बदनाम करण्यासाठीच त्याने गुन्हे विश्वात पाउल ठेवलं आणि इथे तो जगातला सगळ्यात जास्त चर्चा झालेला सीरिअल किलर बनला.