काळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला जोधपूर हायकोर्टाकडून दिलासा

By पूनम अपराज | Published: February 5, 2021 07:03 PM2021-02-05T19:03:16+5:302021-02-05T19:09:16+5:30

Blackbuck Poaching Case : काळवीट शिकार आणि आर्म्स अॅक्ट प्रकरणात अभिनेता सलमान खान याला जोधपूर हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

यानंतर आता सलमान खान कोर्टात हजर होण्यासाठी जोधपूरला येणार नाही. उच्च न्यायालयाने सीजे इंद्रजीत मोहंती आणि न्यायाधीश मनोज गर्ग यांच्या खंडपीठाने सलमान खान याची याचिका स्वीकारली आहे.

या प्रकरणात सलमान खान ६ फेब्रुवारी रोजी जोधपूर सत्र न्यायालयात हजर होणार होता. मात्र, सलमान खान याची कोर्टात वर्च्युअल उपस्थितीबाबत याचिका दाखल केली होती.

अखेर सलमान खानची याचिका मंजूर करण्यात आली असून सध्या त्याला हजेरीसाठी जोधपूर न्यायालयात येण्याची गरज लागणार नाही. 

सलमान खानच्या विरोधात जोधपुरच्या वेगवेगळ्या  न्यायालयात गेल्या दोन दशकांपासून अनेक केसेस सुरू आहेत. सलमान खानने हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान १९९८ मध्ये राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली होती. त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर त्याला ६ दिवस जोधपूर तुरुंगात घालवावे लागले होते.

त्यानंतर या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली होती. या प्रकरणात सलमान खानला दोन वेळा जोधपूर तुरुंगात जावं लागलं आहे. या प्रकरणात सलमान खान व्यतिरिक्त तब्बू, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, आणि निलम यांच्यावरदेखील आरोप करण्यात आले होते.