Crime News: धक्कादायक! आई-वडील, बहीण आणि आजीची हत्या केल्यानंतर त्याने मित्रांसोबत केली पार्टी, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 03:04 PM2021-09-02T15:04:55+5:302021-09-05T12:37:16+5:30

Crime News: पोलीस चौकशीमध्ये आरोपी मुलाने या हत्याकांडाबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. रोहतकचे एसपी राहुल शर्मा यांनी याची माहिती दिली आहे.

हरियाणामधील रोहतक येथील विजयनगर कॉलनीमध्ये शुक्रवारी झालेल्या हत्याकांडाचे गुढ पोलिसांनी उलगडले आहे. २० वर्षांच्याच मुलाने आपल्या आई-वडिलांसह बहीण आणि आजीची हत्या केल्याचे समोर आले. आरोपी अभिषेक ऊर्फ मोनूला पोलिसांनी अटक केली आहे. आता पोलीस चौकशीमध्ये आरोपी मुलाने या हत्याकांडाबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. रोहतकचे एसपी राहुल शर्मा यांनी याची माहिती दिली आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी अभिषेक मोनू याने सांगितले की, हे हत्याकांड घडवल्यानंतर तो मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेला. मित्रांनी खाण्या-पिण्यासाठी खूप काही ऑर्डर केले. मात्र त्याच्या गळ्यातून अन्नाचा घासही खाली जात नव्हता.

पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर करून त्याची पाच दिवसांची कोठडी मिळवली आहे. आता कोठडीमध्ये पोलीस आरोपीकडून हत्याकांडासाठी वापरलेल्या हत्यारासह या प्रकरणाशी संबंधित इतर प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करतील.

अभिषेक याने सांगितले की, तो गेल्या काही दिवसांपासून वडिलांसह संपूर्ण कुटुंबाकडे पाच लाख रुपयांची मागणी करत होता. एवढ्या मोठ्या रकमेची गरज का आहे, असे कुटुंबीयांनी विचारले असता फी भरण्यासाठी आणि मित्रांना देण्यासाठी पैसे हवे असल्याचे सांगितले.

अभिषेक याने अनेक बहाणे बनवून पैशांची मागणी केली. अखेर कुटुंबीयांनी याबाबत आपल्या पातळीवर चौकशी केली. तेव्हा तो पैशांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचे समोर आले.

यावरून अभिषेकवर त्याचे वडील रागावले. तसेच आई आणि बहिणीनेही खडेबोल सुनावले. तर आजीनेही समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच अखेर अभिषेक याने टोकाचे पाऊल उचलत २७ ऑगस्ट रोजी हे हत्याकांड घडवून आणले.