दाऊद इब्राहिमला पकडण्याचा 'मास्टर प्लान' तयार, मोदी सरकारची मोठी खेळी; काय केलं वाचा.. By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 04:55 PM 2022-02-07T16:55:06+5:30 2022-02-07T17:06:25+5:30
Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिमभोवती फास आवळण्यासाठीचा प्लान केंद्रीय गृहमंत्रालयानं तयार केला आहे. डी कंपनी आणि दाऊदशी निगडीत सर्व प्रकरणं आता एनआयकडे सोपवली आहेत. यामुळे नेमकं काय होणार हे जाणून घेऊयात... कुख्यात गुंड आणि दहशतवादी दाऊद इब्राहिम याला पकडण्यासाठीची जबाबदारी आता केंद्रीय गृहमंत्रालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवली आहे. दहशतवादविरोधी प्रकरणांमध्ये तपास करणारी एनआयए ही देशातील सर्वात मोठी तपास संस्था आहे.
दाऊद इब्राहिम याला पकडण्यासाठी एनआयएकडे जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ईडी दाऊदशी निगडीत प्रकरणांचा तपास करत होती.
आता एनआयएकडे आता परदेशात जाऊन कारवाई करण्याचाही अधिकार आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम प्रकरणात मोदी सरकार मोठ्या हालचाली करत असल्याचं दिसून येत आहे.
दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी एक नवा प्लान केंद्रीय गृहमंत्रालयानं तयार केला आहे. याअंतर्गतच दाऊदशी निगडीत सर्व प्रकरणं एनआयएकडे सोपवली आहेत.
दाऊद इब्राहिम, डी कंपनी आणि त्याच्याशी निगडीत इतर दहशतवाद्यांविरोधात UAPA अंतर्गत याआधीच गुन्हे दाखल झालेले आहेत. आता एनआयए देखील यात कारवाई करणार आहे.
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार डी कंपनी आणि दाऊद इब्राहिम भारतात दहशतवादी कारवायांना रसद पुरवणे, नार्को टेटर, ड्रग्जचा व्यापार आणि बनावट नोटांचा व्यापारातून दहशतवाद पसरवण्याचं काम करत आहे. इतकंच नव्हे, दाऊद आणि डी कंपनी लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदाच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया करत आहे.
गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार एनआयए फक्त दाऊद इब्राहिम किंवा डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांचाच तपास करणार नाही. त्यासोबतच अंडरवर्ल्ड डॉनचे हस्तक छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इकबाल मिर्ची (मृत), दाऊदची बहिण हसीना पारकर (मृत) यांच्याशी निगडीत सर्व प्रकरणांचा खोलात तपास करणार आहे.
यूएनकडून याआधीच दाऊद इब्राहिम याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आलेलं आहे. तसंच भारतानंही UAPA अंतर्गत दाऊद इब्राहिम याला मोस्ट वॉण्टेड दहशतवादी घोषीत केलं आहे.
दाऊद सध्या पाकिस्तानात आश्रयाला असल्याचंही बोललं जात आहे. कराचीमधील एका उच्चभ्रू परिसरात तो आपल्या वास्तव्याची ठिकाणं वारंवार बदलून राहत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम याच्यावर एनआयए 120B आणि UAPA च्या विविध कलमांअंतर्गत कारवाई करण्याची तयारी करत आहे.