Delhi Sultanpuri Horror: अंजलीसोबत स्कूटीवर आणखी एक तरुणी होती, कुठे गेली?; दिल्ली हॉरर केस नव्या वळणावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:48 AM2023-01-03T08:48:18+5:302023-01-03T08:53:30+5:30

दिल्लीच्या सुल्तानपुरीमध्ये तरुणीला कारने फरफटत नेल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. अंजली ही तरुणी त्या स्कूटीवर एकटी नव्हती, तर तिच्यासोबत आणखी एक तरुणी होती. स्कूटीवरून जात असताना आरोपींच्या कारशी अपघात झाला. सोमवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी त्या दुसऱ्या तरुणीला शोधून काढले असून तो अपघात होता हे आता कन्फर्म झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दिल्ली पोलीस आज या तरुणीचा जबाब नोंदविणार आहेत. या दोन्ही तरुणी एका हॉटेलमध्ये उपस्थित होत्या. अपघातापूर्वी त्यांनी तिथे काही मित्रांसोबत बर्थ डे पार्टीदेखील केली. आता या मित्रांची देखील चौकशी केली जात आहे. रविवारी रात्री ज्या बलेनो कारला अंजलीची स्कूटी धडकली त्या बलेनो कारमधील पाचही तरुण हे दारुच्या नशेत होते.

दुसऱ्या तरुणीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर ती तेथून घाबरून पळून गेली. तर अंजली ही अपघातावेळी कारच्या समोर पडली आणि कार तिच्यावरून गेली. एका पोलीस अधिकाऱ्यानुसार अंजलीचा पाय कारच्या एक्सलमध्ये अडकला आणि ती १२ किमी पर्यंत फरफटत राहिली.

दिल्ली पोलिसांना ६ ते ७ सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. यामध्ये कार आणि तरुणींच्या मुव्हमेंट आहेत. एका फुटेजमध्ये अंजली रात्री 1.52 वाजता स्कूटीवर दिसत आहे.

दिल्ली पोलिसांचे काही रस्त्यांवर नेहमीचे तपासणी नाके असतात. बाजुच्या रस्त्यावर दोन नाके होते. परंतू आरोपी ज्या रस्त्यावर पोलिसांचे तपासणी नाके नाहीत त्याच रस्त्यावरून कार चालवत होते. यावेळी त्यांचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास असाच होता.

जेव्हा त्या रस्त्यावरील तपासणी नाका आला त्यापूर्वीच आरोपींनी युटर्न घेतला आणि मागे वळले. कार चालविणाऱ्या दीपकला पोलीस कुठे कुठे चेकिंगला असतात याची पुरेपूर माहिती होती, यामुळे तो बिनदिक्कत ९० मिनिटे कार चालवत होता.

दिल्ली पोलिसांनी कारमधील पाच जणांविरुद्ध आयपीसी कलम 304 आणि 120B (गुन्हेगारी कट) लागू केले आहे. पाचही जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींनी आपण दारूच्या नशेत असल्याचे पोलीस चौकशीत सांगितले होते. अपघातानंतर मुलीचा पाय त्यांच्या गाडीत अडकला, त्यांनाही कळले नाही. मात्र जेव्हा कळले, तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. अशा स्थितीत त्यांनी भीतीने मृतदेह रस्त्यावर टाकून पळ काढला.