'ऑनर किलिंग'... आंतरजातीय विवाह केला म्हणून भावांकडून बहिणीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 20:30 IST2020-12-12T20:21:43+5:302020-12-12T20:30:09+5:30

मैनपुरी: आंतरजातीय विवाह करणाऱ्या एका तरुणीची तिच्या भावांनीच हत्या केल्याचे धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये घडली आहे.
या तरुणीने आपल्या आंतरजातीय तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. कुटुंबीयांकडून होणारा विरोध पाहता या दोघांनी एका मंदिरात विवाह केला होता.
या विवाहानंतर मनात राग असलेल्या तरुणीच्या भावाने तिला विश्वासात घेऊन दिल्लीहून मैनपुरी या गावी बोलावून घेतले. गावी आल्यानंतर याठिकाणी भावाने आपल्या इतर दोन भावांसोबत मिळून या बहिणीची हत्या केली.
विशेष म्हणजे, बहिणीची हत्या केल्याचे उघड होऊ नये, यासाठी या तिघा भावांनी मिळून आपल्या बहिणीचा मृतदेह जमिनीत पुरून नष्ट करण्याचाही प्रयत्न केला.
माहेरी गेलेली पत्नी परतली नाही. त्यामुळे तरुणीच्या पतीने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तरुणीच्या भावांची चौकशी केली.
पोलिसांनी केलेल्या या चौकशीत तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपींनी गुन्हा मान्य केल्यानंतर दिल्ली पोलीस मैनपुरीला दाखल झाले.
दिल्ली पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शेतात जाऊन जेसीबीच्या साहाय्याने जमीन खोदून तरुणीचा विघटन झालेला मृतदेह ताब्यात घेतला.