रिअल लाईफमधला 'हिंदी मीडियम'; गरीब विद्यार्थ्याची महागडी कार; पोलखोल होताच कुटुंब फरार By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 06:24 PM 2020-07-16T18:24:38+5:30 2020-07-16T18:44:10+5:30
दिल्लीतील चाणक्यपुरी भागातून एका हिंदी चित्रपटासारखे प्रकरण समोर आले आहे. जेथे एका धनाढ्य व्यक्तीने आपल्या मुलाला सुप्रसिद्ध शाळेत दाखल करण्यासाठी असा कारनामा केला आहे की, जेव्हा त्याची पोल उघड झाली तेव्हा हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले. खरं तर, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असूनही, त्या व्यक्तीने स्वत: ला कमी उत्पन्न गटाचे असल्याचे दाखवून दिले आणि मुलाला प्रख्यात शाळेत नर्सरीमध्ये दाखल केले. मुल जेव्हा महागड्या गाडीत शाळेत गेलं, तेव्हा शाळा प्रशासनाला संशय आला.
‘हिंदुस्तान’ या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, शाळेच्या प्रशासनाने संशयाच्या आधारे चौकशी केली असता असे दिसून आले की, मुलाच्या पालकांनी बनावट मार्गाने मुलाला नर्सरीत प्रवेश घेतला. एवढेच नव्हे तर इतर लोक बनावट मार्गाने शाळेत त्या मुलाचे पालक म्हणून यायचे.
ही बाब न्यायालयात पोहोचली. पटियाला हाऊस कोर्टाने मुलाचे पालक आणि आजोबांसह सात जणांवर आरोप केले. मुलं त्याच्या आजोबांच्या स्वत: च्या महागड्या गाडीतून शाळेत येत असे. तथापि, आजोबांना याबाबत माहिती नसल्याचे जबाबात म्हटल्याने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर झाला.
ही बाब उघडकीस येताच मुलाचे पालक फरार झाले. त्याचवेळी या प्रकरणात आणखी एक खुलासा उघडकीस आला आहे की, आरोपीने काही इतर सुप्रसिद्ध शाळेत बनावट मार्गाने मोठ्या मुलाचे ऍडमिशन केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे.
सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी पालकांचा शोध घेत आहेत. या प्रकरणावर भाष्य करताना कोर्टाने म्हटले की, हा एक गंभीर गुन्हा आहे. या आरोपींच्या माध्यमातून आणखी काही इतर आरोपींची नावे उघड होऊ शकतात.