Crime News: पित्याच्या हत्येचा बदला, तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले; दुसरीलाच संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 03:20 PM2022-12-01T15:20:52+5:302022-12-01T15:27:19+5:30

भयानक म्हणजे यानंतर तिने आपली ओळख पुसण्यासाठी असे काही केले की पोलिसांनाही धक्का बसला आहे.

नोएडाच्या बिसरखमध्ये हत्येचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी खतरनाक प्लॅन रचला होता. यासाठी तिने सोशल मीडियावरून एका तरुणाला पटविले, त्याच्या मदतीने तिने दुसऱ्या एका तरुणीचा खून केला. यापेक्षाही भयानक म्हणजे यानंतर तिने आपली ओळख पुसण्यासाठी असे काही केले की पोलिसांनाही धक्का बसला आहे.

पायल नावाच्या तरुणीने हा खतरनाक कट रचला होता. काही महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांची हत्या झाली होती. तेव्हापासून ती याचा बदला घेण्याची तयारी करत होती. यासाठी तिने फेसबुकवर अजय नावाच्या तरुणाशी मैत्री केली, तिला पाहून अजय तिच्या प्रेमात पडला.

खरेतर हा पायलचाच प्लॅन होता. तिनेच तिच्या सुंदरतेमुळे अजयला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तो तिच्या प्रेमात एवढा पागल झाला होता की तिच्यासाठी काहीही करण्यास तयार होता. पायलने त्याला तिच्यासारख्याच एका मुलीला शोधण्यास सांगितले.

जेव्हा तिच्यासारखी अंगकाठी असलेली तरुणी सापडली तेव्हा पायल आणि अजयने तिचा खून केला. त्या तरुणीच्या मृत्यूनंतर पायलने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकले आणि ओळखता येऊ नये एवढा चेहरा जाळला.

यानंतर पायलने त्या तरुणीला आपले कपडे घातले आणि तिचा मृचदेह अशा जागी फेकला की लोकांच्या नजरेत येईल. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला. इकडे पायल बेपत्ता झाली होती, त्यामुळे तिचे घरवाले त्रस्त होते. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्या तरुणीचा मृतदेह ओळखण्यासाठी पायलच्या कुटुंबीयांना बोलविले.

त्या मृतदेहावर पायलचेच कपडे असल्याने घरच्यांनी तिचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. पायलच्या भावाने अंत्यसंस्कारही केले. दुसरीकडे त्या दुसऱ्या मुलीचे कुटुंबीय देखील पोलिसांत पोहोचले.

मृत मुलीचे नाव हेमलता होते. आता पोलिसांसमोर तपासाचा मुद्दा आला. एकीकडे खून आणि दुसरीकडे दुसऱ्या मुलीचे बेपत्ता होणे याचा तपास करताना पोलिस पायलपर्यंत पोहोचले आणि सगळा गेम उलटा फिरला.