अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनंच काढला काटा; दोन बायका असलेल्या पतीची हत्या By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 10:56 AM 2021-05-04T10:56:29+5:30 2021-05-04T11:08:56+5:30
Beed Crime News : पोलिसांनी ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. यानंतर ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची माहिती उघड झाली आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराईमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गेवराई तालुक्याच्या तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजापूर शिवारात शनिवारी एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती.
या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या मृताच्या चेहऱ्यावर आणि गळ्याभोवती व्रण होते.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली आणि केवळ २४ तासांच्या आत आरोपींना गजाआड केलं आहे.
संबंधित हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. ३२ वर्षीय मृत नाव ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण असून तो गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील रहिवासी होता.
ज्ञानेश्वरचा मृतदेह शनिवारी राजापूर शिवारातील एका शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा होत्या, तर गळ्याभोवती फास दिल्याचे व्रणही होते.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई केली. तपास करत असताना पोलिसांच्या लक्षात आले की, मृत ज्ञानेश्वरची हत्या दुसरी कुणी नाही तर त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने केली.
त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. यानंतर ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची माहिती उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ज्ञानेश्वरला दोन बायक्या होत्या. यातील पहिल्या बायकोचे आरोपी नाना अप्पा शिंदे याच्याशी अनैतिक संबंध सुरू होते.
मागील काही दिवसांपासून त्यांच्यात जवळीक वाढली होती. पण मृत ज्ञानेश्वर त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत होता.
त्यामुळे मृत ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीनं आणि तिच्या प्रियकरानं ज्ञानेश्वरच्या हत्येचा कट रचला आणि त्यानुसार त्यांनी त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी ज्ञानेश्वरचा मृतदेह गेवराई तालुक्यातील राजापूर शिवारात नेवून फेकला.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालात हत्या केल्याची स्पष्ट करण्यात आली आहे.